प्रयत्नांती निर्मिला गुणवत्तेचा आदर्श

विशाल पाटील
सोमवार, 19 जून 2017

सातारा - इंग्रजी शाळांचे लोण ग्रामीण भागातही पसरले. रंगीबेरंगी स्कूल गल्लीगल्लीत दिसू लागल्या. मग, त्याचा फटका जिल्हा परिषद शाळांना सहाजिकच बसला. हे दिव्य प्रयत्नांती पार करण्याची किमया दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) शाळेने केली. गुणवत्तेचा आदर्श निर्मिणाऱ्या या शाळेने आसपासच्या शाळांतील विद्यार्थीही आपल्याकडे खेचण्याची ताकद निर्माण केली. 

सातारा - इंग्रजी शाळांचे लोण ग्रामीण भागातही पसरले. रंगीबेरंगी स्कूल गल्लीगल्लीत दिसू लागल्या. मग, त्याचा फटका जिल्हा परिषद शाळांना सहाजिकच बसला. हे दिव्य प्रयत्नांती पार करण्याची किमया दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) शाळेने केली. गुणवत्तेचा आदर्श निर्मिणाऱ्या या शाळेने आसपासच्या शाळांतील विद्यार्थीही आपल्याकडे खेचण्याची ताकद निर्माण केली. 

तांबवे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेला शैक्षणिक क्षेत्रात आकर्षक करण्याचा निर्धार शिक्षक आबासाहेब साठे, मनीषा साठे, अशोक देसाई, पोपटराव देसाई यांनी केला. त्याला ग्रामस्थांचीही साथ मिळाली. २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये स्वच्छ सुंदर शाळाग्राम स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्यापूर्वी २००९ मध्ये या शाळेची पटसंख्या अवघी ४४ होती. २०१६ मध्ये ती ११९ वर पोचली. लहान वस्ती असलेल्या दक्षिण तांबवेतील एकही मूल आता खासगी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांत जात नाही. शाळेची ही प्रगती पाहून जिल्हाभरातील एक हजार ५०० मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. नवोदय परीक्षेत चार विद्यार्थी, सैनिक स्कूलमध्ये एक, चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ, विविध स्पर्धा परीक्षांत शिष्यवृत्तीसाठी ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामुळे ही शाळा गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

लोकसहभागाच्या ताकदीवर शाळेमध्ये सुधारणा करण्यात आली. गुणवत्तेबरोबर भौतिकतेत सुंदर, बोलक्‍या भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सर्वांना ट्रॅकसूट, रात्रअभ्यासिका, आजचा राजकुमार-राजकुमारी, दप्तराविना शनिवार, शालेय बाग, ऑक्‍सिजन पार्क, औषधी वनस्पतींची बाग, परसबाग, गांडूळ खत प्रकल्प, ई-लर्निंग, संगणक प्रयोगशाळा, यशवंत प्रयोगशाळा, शिक्षक-विद्यार्थी ग्रंथालय, ज्ञानरचनावादी वर्ग व अध्यापन, सीसीटीव्ही कॅमेरे, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, कला-कार्यानुभव मार्गदर्शन, कौन बनेगा वाचकपती असे तब्बल ३५ उपक्रम ही शाळा राबवत आहे. 

संपूर्ण टॅबयुक्‍त शाळा, शाळासिध्दी उपक्रमात ‘अ’ श्रेणी मिळविणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात शाळा १०० टक्‍के प्रगत ठेवणे, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणात सातत्य राखणे हे उद्दिष्ट ठेवले असून, त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. शाळेला मोठी इमारत मिळावी, ही अपेक्षा शिक्षक, ग्रामस्थांना आहे. 

...हे गवसले...
प्रगत शैक्षणिक’मध्ये १०० टक्‍के प्रगत
ग्रामीण गुणवत्ता’मध्ये जिल्ह्यात चौथी
शाळाग्राम स्पर्धे’मध्ये तालुक्‍यात प्रथम
आयएसओ मानांकित प्राथमिक शाळा
तीन वर्षांत लोकसहभागातून सहा लाख

Web Title: satara news school education