कृतीशील योगदानामुळे विद्यार्थीनीच्या शिक्षणाला आधार

राजेंद्र वाघ
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

शिक्षणाची ज्ञानगंगा वेशीपलीकडील झोपडीत पोचविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दानशूरांना साद घातली. समाजाला दातृत्वाची सवय लावून उपेक्षीत, वंचितांना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. कर्मवीरांचा हाच वसा पुढे सुरु ठेवण्यात आल्याचा प्रयत्य या निमित्ताने आला आहे.

कोरेगाव : नुकताच नेव्हीमध्ये भरती झालेल्या येथील डीपी भोसले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ‘कॅडेट’ने आपल्या पहिल्या पगारातून दहा हजारांची मदत दिली असून, त्यातून याच महाविद्यालयातील एका पारधी समाजातील विद्यार्थीनीला सायकल भेट देण्यात आली आहे. एका माजी विद्यार्थ्याने दिलेल्या या कृतीशील योगदानामुळे उपेक्षित घटकातील विद्यार्थीनीच्या शिक्षणाला आधार मिळाला आहे. 

शिक्षणाची ज्ञानगंगा वेशीपलीकडील झोपडीत पोचविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दानशूरांना साद घातली. समाजाला दातृत्वाची सवय लावून उपेक्षीत, वंचितांना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. कर्मवीरांचा हाच वसा पुढे सुरु ठेवण्यात आल्याचा प्रयत्य या निमित्ताने आला आहे. याबाबतची माहिती अशी की, येथील डीपी भोसले महाविद्यालयामध्ये एका पारधी कुटुंबातील दीपा अजमेर काळे ही विद्यार्थीनी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे. दीपा काळे ही विद्यार्थिनी विवाहित असून, तिला चार महिन्याचे बाळ आहे. बाळाला झोपडीत ठेवून दीपा शिक्षणासाठी महाविद्यालयात येते.

महाविद्यालयातील अध्ययनानंतर ती बाळाच्या ओढीने कधी चालत, तर कधी धावत घराकडे जाते. शिक्षण आणि मातृत्व, अशा दुहेरी ओढीने अस्वस्थ करायला लावणारी तिची रोजची धडपड क्रीडा शिक्षक व एनसीसीचे प्रमुख प्रा. बाळकृष्ण भोसले यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिला मदत करण्याचा मानस बोलून दाखविला. दरम्यान, राष्ट्रीय छात्र सेनेचा ‘कॅडेट’ संदीप विजय संकपाळ हा नुकताच नेव्हीमध्ये भरती झाला आहे. त्याने पहिल्या पगारातील दहा हजारांची रक्कम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेकडे सुपूर्द केली. या रकमेतून दीपा अजमेर काळे या विद्यार्थिनीला प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, डॉ. मोहन राजमाने, डॉ. चंद्रकांत खिलारे, डॉ. सुरेश साळुंखे यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. त्यामुळे दीपाची रोजची धावपळ कमी होण्यास आता मदत होणार आहे. संदीपची महाविद्यालयाविषयीची कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी, उपेक्षितांची शिक्षणाबाबतची ओढ आणि वंचितांच्या शिक्षणाबाबतचा महाविद्यालयाचा सकारात्मक दृष्टिकोन, असे विविध पैलू दर्शवणाऱ्या या घटनेमुळे कर्मवीरांचा वसा पुढे सुरु ठेवण्यात आल्याचा प्रयत्य आला आहे. 

Web Title: Satara news school in koregaon