जोपासना ‘शाळा माझी, मी शाळेचा’ विचाराची

विशाल पाटील
शुक्रवार, 16 जून 2017

लोकसहभागातून २३ लाखांची कामे; चिखल गेला आणि आली झळाळी

सातारा - पावसाळा सुरू झाला की शाळेचाच ‘चिखल’ होत असे... विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उठलेली समोरील गटारांची दुर्गंधी... पालकांच्या तक्रारी... अशा परिस्थितीत गावाने ठरविले आणि बदलून दाखविले...‘शाळा माझी, मी शाळेचा’ मंत्र जोपासत प्रत्येक गावकरी, शिक्षकांनी तब्बल २३ लाखांमध्ये लोकसहभागातून शाळेला नवे रूप आणून दाखविले. आता ‘चिखल’ गेला आणि ‘झक्‍कास’ शाळा 

लोकसहभागातून २३ लाखांची कामे; चिखल गेला आणि आली झळाळी

सातारा - पावसाळा सुरू झाला की शाळेचाच ‘चिखल’ होत असे... विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उठलेली समोरील गटारांची दुर्गंधी... पालकांच्या तक्रारी... अशा परिस्थितीत गावाने ठरविले आणि बदलून दाखविले...‘शाळा माझी, मी शाळेचा’ मंत्र जोपासत प्रत्येक गावकरी, शिक्षकांनी तब्बल २३ लाखांमध्ये लोकसहभागातून शाळेला नवे रूप आणून दाखविले. आता ‘चिखल’ गेला आणि ‘झक्‍कास’ शाळा 

झाली असून ही किमया केली आहे, कऱ्हाड तालुक्‍यातील तासवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने. शाळेची भौतिक स्थिती चांगली नसल्याने गुणवत्ता ढासळली. गावातील मुले इतर शाळांत जाऊ लागली. पालकांच्या तक्रारी वाढल्या. शिक्षकांची मानसिकता खचली. अशा परिस्थितीत ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेची पाहिजे,’ या उक्‍तीप्रमाणे शाळेत बदल करायचे ठरविले आणि काही वर्षांत ते झालेही. ग्रामसभेत विकास आराखडा तयार झाला. त्यानुसार लोकसहभाग, शासकीय योजना, लोकप्रतिनिधींमार्फत मिळणाऱ्या निधीचा समन्वय साधत गावात शैक्षणिक क्रांतीच झाली. १७४ पटसंख्या आता २१२ वर पोचली आहे. सातवीपर्यंतची गावातील सर्वच मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. 

प्रजासत्ताकदिनी ‘खाऊ ऐवजी शाळेला पुस्तके द्या’ असा उपक्रम राबविण्यात आला. त्यातून एकाच दिवशी तब्बल २०५० पुस्तके शाळेला भेट मिळाली. वीज बिलाचा प्रश्‍न सुटावा, यासाठी एक लाख रुपये लोकसहभागातून जमा करून त्याची ‘एफडी’ केली आहे. त्याच्या व्याजातून वीज बिल दिले जाते. भौतिक सुविधेने परिपूर्ण झालेली शाळा गुवणत्तेतही मागे नाही. ‘एकच ध्यास, गुणवत्ता विकास’ हे ब्रीद घेऊन शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात सलग दोन वर्षे जिल्हास्तरावर प्रथम तीनमध्ये क्रमांक मिळविला. यशवंतराव चव्हाण स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक, तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. आज पहिली ते सातवीपर्यंतचे एकही मूल शिक्षणासाठी बाहेर जात नाही, अशी किमया या शाळेने साधली आहे. 

हे झाले लोकसहभागातून
शाळेच्या आवारात कूपनलिका, शाळेसाठी फर्निचर, संरक्षक भिंत, इन्व्हर्टर, सुरपेटी, तबला, फायबर खेळणी, मुलां-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वेस्टर्न शौचालय, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही, एल.सी.डी. प्रोजेक्‍टर, प्रत्येक वर्गात साउंड सिस्टिम, स्वतंत्र संगणक कक्ष, समृद्ध वाचनालय, प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कक्ष, हॅण्डवॉश स्टेशन, शाळेच्या अंगणात पेव्हर ब्लॉक, परस बाग, शाळा व वर्गांच्या बोलक्‍या भिंती, प्रत्येक वर्गात आरसे, दरवाजे, खिडक्‍यांना पडदे, विषय कोपरा, शुद्ध पाण्यासाठी ॲक्‍वागार्ड अशा अनेक सुविधा लोकसहभागातून उभारल्या असून, त्यासाठी २३ लाख रुपये लोकसहभागातून जमा झाले.

शाळेविषयीची छायाचित्रे, व्हिडिओ पहा...
https://www.facebook.com/satarasakal/

 

हे गवसले
शाळेला मिळाली नवीन इमारत
एका दिवशी २०५० पुस्तके भेट
स्वच्छ, सुंदर शाळेत तालुक्‍यात प्रथम
गुणवत्ता विकासात प्रथम तीनमध्ये

Web Title: satara news school start