शिक्षकांअभावी विशेष मुलांची परवड

शिक्षकांअभावी विशेष मुलांची परवड

जिल्ह्यात मोबाईल टीचरची संख्या कमी; सात हजार विशेष मुले वाऱ्यावर
सातारा - कोणाला चालता येत नाही, कोणाला बोलता, ऐकता येत नाही, तर कोणाला दिसत नाही, कोण दुर्धर आजारग्रस्त आहेत. ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यास पात्र नाहीत का? असा सवाल शासनाला विचारण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सात हजार २०५ विशेष मुले असून, त्यांना त्यांच्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी फक्त ६० मोबाईल टीचर (फिरते विशेष शिक्षक) आहेत. केंद्रनिहाय एक याप्रमाणे २३२ शिक्षकांची आवश्‍यकता असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

सर्वांना सक्‍तीचे व मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाने ‘आरटीई २००९’ कायदा लागू केला. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी शासन डंका वाजवत आहे. मात्र, ज्यांना शिक्षण देणे अत्यंत आवश्‍यक आहे, त्यांच्यासाठी आवश्‍यक बाबी पुरविण्याचे धाडस शासन दाखवत नाही. २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घातली आहे. त्याचा थेट फटका विशेष मुलांना बसत आहे. जिल्ह्यात ‘अपंग समावेशित शिक्षण’अंतर्गत सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण घेऊ शकणारे चार हजार ८८१ विशेष मुले, तर विशेष शिक्षकांद्वारे शिक्षणाची आवश्‍यकता असलेली दोन हजार ३२४ विशेष मुले आहेत.

जिल्ह्यात एकूण केंद्रांची संख्या २३२ आहे. या विशेष मुलांच्या अध्यापनाची गरज लक्षात घेता प्रत्येक केंद्रावर एक मोबाईल टीचर आवश्‍यक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आणण्यासाठी मोबाईल टीचरच्या माध्यमातून मुलांच्या समस्यांवर उपाय शोधले जातील. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व साह्यभूत सेवा उपलब्ध करून देऊन शाळेत टिकवून ठेवण्यास मदत होईल. मात्र, जिल्ह्यात याबाबत विदारक स्थिती दिसते. अवघे ६० मोबाईल टीचर कार्यरत आहेत. सध्या जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, पाटण येथे प्रत्येकी एक डे केअर सेंटर कार्यरत आहे. 

मोबाईल टीचर मिळावेत, यासाठी जिल्हा परिषद वर्षांनुवर्षे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठपुरावा करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही जुलैमध्ये शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यालाही केराचा टोपली दाखविल्याचे दिसते. विशेष मुलांनाही शिक्षणाचा हक्‍क आहे, तर त्यांना विशेष शिक्षक देणेही आवश्‍यक आहे, याकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज आहे.

मोबाईल टीचरची तालुकानिहाय सद्य:स्थिती
तालुका    शिक्षक    केंद्र

सातारा    ८    २७
कोरेगाव    ५    १७
खटाव    ३    २१
माण    ८    १९
फलटण    ८    २५
खंडाळा    ३    ९
वाई    ५    १६
महाबळेश्‍वर    ५    १२
जावळी    ३    १८
कऱ्हाड    ६    २५
पाटण    ६    ४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com