शेखर गोरे बंडाच्या पवित्र्यात! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

"मी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मानतो, पक्षातील इतर कोणाला नाही. जिल्ह्यातील नेतृत्वाच्या विरोधात लवकरच मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाने दिले तर ठिक; अन्यथा पक्ष आणि जिल्ह्यातील पक्षाच्या नेतृत्वाला बाजूला ठेऊन वेगळी भूमिका घेण्याची आपली तयारी आहे.'' 
- शेखर गोरे, राष्ट्रवादीचे नेते

सातारा - राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनीच विधान परिषदेच्या निवडणुकीत मला अडचणीत आणले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह आताच्या नियोजन समितीमध्येही जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने मला ताकद देण्याऐवजी डावलण्यातच धन्यता मानली. त्यामुळे पक्ष आणि जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाच्या विरोधात वेगळी भूमिका घेणार आहे, असा इशारा माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. आगामी काळातील माझी भूमिका मी येत्या 22 जुलैला मांडणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

नियोजन समितीच्या निवडणुकीत उमेदवार देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी शेखर गोरेंना जमेत न धरताच सर्व व्यूहरचना केली. यामुळे शेखर गोरे संतप्त झाले आहेत. यासंदर्भात त्यांची आगामी काळातील भूमिका "सकाळ'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ""जिल्हा नियोजन समितीत माझ्या विचाराचे दोन उमेदवार आहेत. कोणत्याही परिस्थितीत आमचे उमेदवार अर्ज मागे घेणार नाहीत. हे दोन उमेदवार मी माझ्या ताकदीवर निवडून आणणार आहे. त्यासाठी लागेल त्याची मदत घेण्याची आमची तयारी आहे; पण पक्षापुढे हात पसरणार नाही.'' 

पक्षाच्या जिल्ह्यातील नेतृत्वावर टीका करताना शेखर गोरे म्हणाले, ""माण तालुक्‍यात कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला पक्षात घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली मी जयकुमार गोरेंचा सुसाट सुटलेला वारू अडविला; पण जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने मला ताकद देण्याऐवजी डावलण्यातच अधिक धन्यता मानली. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला अडचणीत आणले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह आताच्या नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीही उमेदवार देताना पक्षाकडून आपल्याला विचारणाही झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेतृत्वावर माझा विश्‍वास राहिलेला नाही. माझे केवळ एकच ध्येय होते. माण तालुक्‍यातील जनतेची जयकुमार गोरेंकडून होणाऱ्या अन्यायातून मुक्तता करून येथील विकासाला प्राधान्य देणे; पण त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणतीही ताकद मिळाली नाही. उलट मला डावलण्याकडेच अधिक भर राहिला आहे. माणमधील लुंग्यासुंग्या नेत्यासारखे मागे लागून पदे आणि प्रतिष्ठा घेण्यात मला अजिबात रस नाही. मी माझ्या ताकदीने आणि कर्तृत्वाने कार्यरत राहणार आहे. पक्षाने दिले तर ठिक; अन्यथा माझ्या मार्गाने मी जाण्यास तयार आहे.'' यापुढे माण तालुक्‍यातील जनतेला आमदार जयकुमार गोरेंच्या अन्यायापासून मुक्तता देऊन तालुक्‍यातील विकासाला प्राधान्य देण्यावरच आपला भर राहील, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: satara news shekhar gore ncp