सेनेची डरकाळी... भाजपचा कानाडोळा! 

सेनेची डरकाळी... भाजपचा कानाडोळा! 

सातारा - शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसते. शिवसेना मनापासून आमच्या सोबत होती कधी, असा प्रश्‍न करून आगामी निवडणुकीत भाजप सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या आठही मतदारसंघांत सक्षम उमेदवार देणार आहे. सध्या तरी माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, साताऱ्यात पक्षाची बाजू भक्कम दिसते. 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या पाच जणांवर पक्षबांधणी आणि विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला निवडणुका जवळ येईपर्यंत साधारण वर्ष-सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार आहे. आजपर्यंत शिवसेनेने साथ दिलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सातारा जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेकडे दुर्लक्षच केले आहे. शिवसेनेची जिल्ह्यात ताकद किती आणि आजवर शिवसेनेच्या नेत्यांनी मनापासून कधी मदत केली, असे प्रश्‍न भाजपचे नेते उपस्थित करत आहेत. उलट आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांतही यश मिळविले. त्यामुळे या यशाच्या जोरावर भाजपचे नेते आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. 

सध्या सातारा जिल्ह्यात माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, सातारा येथे भाजपची मजबूत बांधणी असून तेथे उमेदवारही सक्षम आणि तगडा आहे. मागील वेळी कोरेगाव, फलटण, वाई हे मतदारसंघ शेतकरी संघटनेसाठी भाजपने सोडले होते. त्यामुळे यावेळेस शेतकरी संघटना त्यांच्यासोबत राहणार का, हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांतही भाजपला लक्ष द्यावे लागणार आहे. उर्वरित पाटण मतदारसंघात सध्या शिवसेनचे आमदार शंभूराज देसाई आहेत. तेथे भाजप फारसे लक्ष घालण्याची शक्‍यता कमी दिसते. मागील निवडणुकीतील यशावर भाजपने आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची बांधणी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते किती यशस्वी होणार, याचीच उत्सुकता आहे. 

जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे वर्चस्व नाही. भाजपने मागील तीन-चार निवडणुकांत चांगले यश मिळविले आहे. या यशाच्या जोरावर आम्ही आगामी विधानसभा व लोकसभेची बांधणी करणार आहोत. त्यामुळे शिवसेनेची मदत असली काय, नसली काय, काहीही फरक पडत नाही. 
- ऍड. भारत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप 

भाजपला शिवसेनेने कधीही मनापासून मदत केली नाही. यापूर्वीच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढल्या आहेत. शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याने सातारा जिल्ह्यात भाजपला काहीही फरक पडणार नाही. उलट आम्ही सर्व ठिकाणी सक्षम उमेदवार देऊ. 
- डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com