शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांना धक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सातारा - कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुरुचीसमोर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 14 समर्थकांचे अटकपूर्व व अटक झालेल्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी आज फेटाळले. त्यामुळे आमदार गटाला मोठा धक्का बसला आहे. 

सातारा - कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुरुचीसमोर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 14 समर्थकांचे अटकपूर्व व अटक झालेल्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी आज फेटाळले. त्यामुळे आमदार गटाला मोठा धक्का बसला आहे. 

आनेवाडी टोलनाक्‍याच्या हस्तांतरणाच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांत सुरुचीसमोर धुमश्‍चक्री झाली होती. या वेळी गोळीबारही झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटांवर खुनाच्या प्रयत्नांचे प्रत्येकी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यामध्ये दोन्ही बाजूंकडील 18 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. अटकेत असणाऱ्या आमदार समर्थकांनी जामिनासाठी व साताऱ्यातून बाहेर असणाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केले होते. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्यांमध्ये पालिकेचे माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, बाजार समितीचा सभापती ऍड. विक्रम पवार, नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे, फिरोज पठाण, अन्सार आतार, मुक्तार पालकर व मयूर बल्लाळ यांचा समावेश होता. जामिनासाठी हर्षल चिकणे, चेतन सोळंकी, अनिकेत तपासे, निखिल वाडकर, निखिल सोडमिसे, प्रतीक शिंदे यांनी अर्ज केला होता. 

गेल्या आठवड्यात या अर्जांवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. संशयितांच्या वतीने ऍड. अरविंद कदम, ऍड. धीरज घाडगे व ऍड. श्रीकात हुटगीकर यांनी युक्तिवाद केला होता. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मिलिंद ओक व नितीन मुके यांनी युक्तिवाद केला होता. निर्णयासाठी न्यायालयाने आजची तारीख ठेवली होती. आज दुपारी आमदार समर्थकांनी जामीन व अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायाधीश देशपांडे यांनी फेटाळले. त्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. खासदार समर्थकांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी सुरू होणार आहे. 

Web Title: satara news shivendrasinh raje court