मोजणी खोळंबल्याने वादावादी

मोजणी खोळंबल्याने वादावादी

काशीळ - जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात मोजणीची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या एकूण मंजूर ६१ भूकरमापकांपैकी निम्मी पदे रिक्त असल्यामुळे शेतकरी, नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. या रिक्त पदांमुळे जिल्ह्यात जूनअखेर तब्बल सहा हजार ९७४ मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात शेतीची मोजणी, हद्द कायम करणे, नकाशे, नकला काढणे आदी कामांचा समावेश असून, ही कामे वेळेत होत नसल्यामुळे गावोगावी वादावादीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.

शासन पातळीवर शहर, गाव पातळीवर महसूल, पोलिस, त्याखालोखाल भूमिअभिलेख अर्थात मोजणी कार्यालय हे महत्त्वाचे असते. शेती, घर, बंगला, प्लॉट आदी बाबींमध्ये मोजणी कार्यालय महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मोजणी कार्यालयांत शेतकरी वर्गासह सर्वांची पिळवणूक होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. साधी, तातडीच्या मोजणीचे शुल्क भरूनही मोजणी वेळेत न मिळणे ही समस्या प्रामुख्याने समोर येते. त्यात सर्वसामान्य शेतकरी वर्गाची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येते. त्याउलट बिल्डर, लॅंड डेव्हलपर, एजंट, राजकारण्यांना आर्थिक तडजोडीतून चांगली वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

ही एक बाजू असली, तरी दुसऱ्या बाजूने या कार्यालयांत आज अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेही या कार्यालयांत कामे होताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक ही पदे कित्येक वर्षे रिक्त असलेल्या चारपैकी तीन तालुक्‍यांत मे महिन्यात ही पदे भरली असून, अजूनही पाटण येथील उपअधीक्षक पद हे रिक्त आहे, तसेच सर्वच कार्यालयांमध्ये भूकरमापक, नक्कल देणारा प्रतिलिपी लिपिक, छाननी लिपिक, निमतानदार आदी महत्त्वाची पदेही रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे व शेतकरी, नागरिकांचे समाधान करणे अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

मोजणीच्या दर्जाबाबत साशंकता
जमीन मोजणीसाठी भूकरमापक असणे आवश्‍यक असताना ५० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ६१ भूकरमापकांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या केवळ ३१ भूकरमापक कार्यरत आहेत. उर्वरित ३० भूकरमापक पदे आजही रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने जमीन मोजण्यासाठी लिपिक, शिपाई यांचा वापर केला जातो. यामुळे अनेक वेळा मोजणी करताना अडचणी निर्माण होत असते. त्यांच्याकडून होणाऱ्या कामाबाबत साशंकता निर्माण होत आहे.


जूनअखेर तालुकानिहाय मोजणीची प्रलंबित प्रकरणे
सातारा- ८४१, कऱ्हाड- ७८०, कोरेगाव- १२०७, खटाव- १२०७, फलटण-५५१, माण- ५०३, खंडाळा-४०४, वाई- ३८७, महाबळेश्‍वर- ८८, जावळी- २२५, पाटण- ७८१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com