सोशल मीडियावर एक्‍झिट पोलची नवी टुम! 

संजय जगताप
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मायणी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर उणी-दुणी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे. मोबाईल ॲपद्वारे नव्यानेच सरपंचपदासाठी एक्‍झिट पोलची टुमही निघाली आहे. त्यामधील कमी-अधिक मताधिक्‍यामुळे राजकीय वातावरण धुमसू लागलेय. सोशल मीडियावर एक्‍झिट पोलला ऊत आला असून त्यामध्ये तरुणाई अधिक सक्रिय झाली आहे. 

मायणी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर उणी-दुणी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे. मोबाईल ॲपद्वारे नव्यानेच सरपंचपदासाठी एक्‍झिट पोलची टुमही निघाली आहे. त्यामधील कमी-अधिक मताधिक्‍यामुळे राजकीय वातावरण धुमसू लागलेय. सोशल मीडियावर एक्‍झिट पोलला ऊत आला असून त्यामध्ये तरुणाई अधिक सक्रिय झाली आहे. 

येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागलेय. गुदगे व येळगावकर या कट्टर विरोधी गटांतच काट्याची लढत होणार आहे. सुमारे ५० वर्षांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी गुदगे गटाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. सत्ता बदलासाठी येळगावकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दादासाहेब कचरेंना सरपंच करण्यासाठी युवा नेते सुरेंद्र गुदगेंनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांना शह देण्यासाठी माजी आमदार डॉ. येळगावकरांनी सर्व विरोधकांची मोट बांधली आहे. सुरेंद्र गुदगेंचेच सख्खे भाऊ सचिन यांना सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सचिन हे पहिल्यांदाच गावपातळीवरील सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांना माजी उपसरपंच दादासाहेब कचरे यांच्या रूपाने बंधू सुरेंद्र गुदगेंचेच आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे खरी लढाई ही गुदगे बंधूंतच असल्याचे बोलले जात आहे. परिणामी सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.  जिल्हा परिषद, मायणी अर्बन बॅंक निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर सचिन यांची ही तिसरी निवडणूक आहे. त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याने विजयासाठी सर्वांगीण ताकद लावली आहे. 

कोणत्याही स्थितीत सत्ता जैसे थे ठेवण्याचा व सरपंचपदी कचरे यांना निवडून आणण्याचा निर्धार करून सुरेंद्र गुदगे परिश्रम घेत आहेत. विकासकामांचा लेखाजोखा मांडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगेंसह प्रमुख कार्यकर्त्यांची फौज घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. येळगावकर गटाकडून टेंभूचे पाणी मायणी तलावात आणणारच असल्याची ग्वाही मतदारांना दिली जात आहे. पिण्याच्या पाण्यासह गावातील विविध नागरी समस्यांकडे मतदारांचे लक्ष वेधले जात आहे. माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख, मानसिंग देशमुख, काँग्रेसचे सूरज पाटील, शिवसेनेचे सचिन भिसे यांची त्यांना साथ मिळत आहे. 

सोशल मीडियावर मोबाईल ॲपच्या माध्यमातून एक्‍झिट पोल घेतले जात आहेत. कोण होणार सरपंच? यावर मतदान करण्याचे आवाहन करून, संबंधित पोस्ट विविध ग्रुपमध्ये व्हायरल केली जात आहे. आपल्याच उमेदवाराला मताधिक्‍य मिळावे, यासाठी समविचारी ग्रुपवर मतांचा कौल घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच सरपंचपदाचे उमेदवार असलेल्या दादासाहेब कचरे व सचिन गुदगे यांच्या मतांचा  आलेख सतत कमी-अधिक होत आहे. त्यातूनच वादाला तोंड फुटत आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती..!
वचननामा, जाहीरनामा, गाठीभेटी, कोपरा सभा व सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. त्यामुळे ‘ऑक्‍टोबर हिट’बरोबर तापलेल्या राजकीय वातावरणाच्या झळांनी मायणीकर बेचैन झालेत. कोणता झेंडा घेऊ हाती... असा यक्ष प्रश्न त्यांना पडला आहे. 

Web Title: satara news social media exit poll