सोयाबीन विक्रीत शेतकऱ्यांची फरफट 

सोयाबीन विक्रीत शेतकऱ्यांची फरफट 

कोरेगाव - सातारा जिल्ह्यात यंदा सोयाबीनची लागवड आणि उत्पादन विक्रमी झालेले असताना सोयाबीनची विक्री करताना मात्र शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. शासनाने क्विंटलला तीन हजार 50 रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना व्यापाऱ्यांनी मात्र, मातीमोल अशा दोन हजार रुपये क्विंटलपासून मनाला येईल, त्या दराने खरेदी करण्यावर भर दिला आहे. हमीभाव केंद्रांवरील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पडत्या दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात चार हमीभाव खरेदी केंद्रे सुरू असून, त्याद्वारे कालअखेर केवळ 718 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र 45 हजार हेक्‍टर आहे. अनुकूल वातावरण व दर चांगला मिळत असल्याच्या भावनेने यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या 162 टक्के म्हणजे 73 हजार 44 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. उत्पादनही चांगले निघाले. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काढणी झाली. दिवाळीच्या तोंडावर सोयबीन विकून दिवाळी करण्याचा बेत शेतकरी वर्गाने आखलेला होता. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे (3050 प्रती क्विंटल) सोयाबीन खरेदीस व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर विरजण पडले. शेतकऱ्यांना दिवाळी व रब्बीची पेरणी उसणवारीवर करावी लागली. 

शासनाने मार्केटिंग फडरेशनसह बाजार समित्या, खरेदी- विक्री संघांच्या सहकार्याने सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू केली. मात्र, त्यास ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडला. त्यामध्ये कऱ्हाड, सातारा, कोरेगाव आणि वाई येथे हमीभाव केंद्रे सुरू झाली. मात्र, जाचक अटींमुळे तेथे म्हणावी अशी आवक होताना दिसत नाही. सोयाबीन विकण्यासाठी सात- बारा उताऱ्यासह बाजार समिती वा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे, सोयाबीन स्वच्छ, निवडलेला हवे व आर्द्रता 12 पर्यंत या अटींमध्ये बहुतांश सोयाबीन बसत नसल्याने शेतकऱ्यांना ते परत न्यावे लागत आहे. त्यात माल केंद्रावर आणणे आणि परत नेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. 

सोयाबीन हमीभाव केंद्रांतून नाकारलेला (रिजेक्‍ट) माल सहायक निबंधक (सहकारी संस्था), तालुका कृषी अधिकारी व बाजार समिती सचिव व शेवटी जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने खासगी व्यापाऱ्यांना सरळ विकण्याची शेतकऱ्यांना व खरेदी करण्याची व्यापाऱ्यांना अधिकृत परवानगी दिली आहे. मात्र, त्यात शेतकऱ्यांना खूप मनःस्ताप होत असून, वेळही जात आहे. पुन्हा व्यापारी म्हणेल त्या दराने म्हणजे अगदी क्विंटलला दोन हजार रुपयांपासूनही सोयाबीन विकावे लागते आहे. त्यात नव्याने व्यापाऱ्यांनीही सोयबीन खरेदीचे पैसे बॅंक खात्यावर जमा करण्याची पद्धती अवलंबल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

दरम्यान, कोरेगाव येथे सुरू असलेल्या हमीभाव केंद्राला जिल्ह्यात सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. बाजार समितीच्या आवारात पूर्वी ज्या पद्धतीने घेवडा, शेंगेची आवक व खरेदी- विक्रीचे लिलाव होत असत, तसे आता बाजार समितीच्या आवार हमीभाव केंद्र सुरू झाल्याने फुलून जात आहे. 

रिजेक्‍ट सोयाबीन शासनानेच खरेदी करावे 

सोयाबीन हमीभाव केंद्रांवर तीन हजार 50 दरासाठी पात्र ठरणारे सोयाबीन खरेदी केल्यानंतर जे सोयाबीन रिजेक्‍ट होते आहे. त्याची खरेदीही शासनाने त्याच जागी करावी. त्यासाठी हमीभावापेक्षा थोडा कमी किंवा दर्जानुसार  दर दिला तरी चालेल. मात्र, त्याची खरेदी त्याच जागी करावी. हमीभाव केंद्रांवर चाळण्यांची व्यवस्था मोफत करावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. 

""कोरेगाव बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन हमीभाव केंद्रातून नाकारण्यात आलेले सोयाबीन शेतकरी वर्ग खासगी व्यापाऱ्यांकडे विकत आहे. हे सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांनी आपले वजनकाटे अद्ययावत ठेवावेत. त्याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रार आली, तर कडक कारवाई केली जाईल.'' 
- प्रतापराव निकम (कुमुकले),  सभापती, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती 

जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव केंद्रे व खरेदी 
केंद्र सुरू झाल्याची तारीख खरेदी (क्विंटलमध्ये) ऑनलाइन नोंदणी शेतकरी 
कऱ्हाड 25 ऑक्‍टोबर 300 250 
कोरेगाव 30 ऑक्‍टोबर 878 357 
सातारा 4 नोव्हेंबर 200 151 
वाई 5 नोव्हेंबर 72 55 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com