उसाचा पहिला हप्ता  कोण जाहीर करणार? 

विकास जाधव
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

काशीळ - जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत १५ पैकी दहा कारखान्यांनी एफआरपीशिवाय जादा २०० रुपये हा फॉर्म्युला मान्य केला आहे. मात्र, प्रत्येक कारखान्याचा वेगवेगळा साखर उतारा असल्याने कोणता कारखाना किती व कधी दर जाहीर करणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 

काशीळ - जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत १५ पैकी दहा कारखान्यांनी एफआरपीशिवाय जादा २०० रुपये हा फॉर्म्युला मान्य केला आहे. मात्र, प्रत्येक कारखान्याचा वेगवेगळा साखर उतारा असल्याने कोणता कारखाना किती व कधी दर जाहीर करणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या बैठकीस अनुपस्थित असलेल्या चार कारखान्यांनी दराबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण १५ साखर कारखाने आहेत. त्यातील बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, मगच ऊस तोड करावी यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आणखी चिघळू नये व ऊस दराचा तिढा सुटावा, यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात कोल्हापूरप्रमाणे एफआरपीशिवाय जादा २०० रुपये हा फॉर्म्युला मान्य करण्यात आला. त्याचबरोबर काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्यापेक्षाही जादा दर देण्याची तयारी दाखवली. प्रत्येक कारखान्याचा सरासरी साखर उतारा वेगवेगळा असल्याने पहिल्या हप्त्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे कोणता कारखाना किती पहिला हप्ता देणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील साखर उताऱ्यावरून दोन हजार ७०० रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत पहिला हप्ता निघण्याचे संकेत आहेत. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने अजूनही पहिल्या हप्त्याचा आकडा जाहीर केला नाही. प्रत्येक कारखान्याने पहिला हप्ता किती जाहीर करणार, याबाबत अधिकृत घोषणा करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. पहिल्या हप्त्याचे आकडे स्पष्ट केल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला किती ऊस दर मिळणार, हे समजेल आणि त्यांना जास्त दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देता येईल. 

चार कारखाने काय दर देणार?
प्रशासनाच्या बैठकीस पाच कारखान्यांचे प्रतिनिधी गैरहजर होते. अनुपस्थित कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन ऊस दर निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी ‘ग्रीन पॉवर’ कारखान्याने ऊस दराचा ठरलेला पॅटर्न मान्य केला आहे. अजूनही चार कारखान्यांनी या पॅटर्नबाबत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असल्याने या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून या कारखान्यांना पॅटर्नबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी केली जात आहे. 

एफआरपीशिवाय जादा २०० हा फॉर्म्युला ११ कारखान्यांनी मान्य केला आहे. उर्वरित कारखान्यांनीही हा पॅटर्न मान्य करून ऊस दर जाहीर करावा. कोण किती दर देणार, हे स्पष्ट होण्यासाठी सर्व कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करावा. 
-सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: satara news sugarcane