आव्हान... धाडसी पोलिसिंग टिकवण्याचे! 

आव्हान... धाडसी पोलिसिंग टिकवण्याचे! 

सातारा - तत्कालीन पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्नांपासून आलेल्या पोलिस अधीक्षकांनी उत्तरोत्तर चांगले काम करत पोलिस अधीक्षकपद उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे पंकज देशमुख यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ते येण्यापूर्वीच व्हॉट्‌सऍप ग्रुपवर फिरणाऱ्या पोस्टमुळे त्यांच्याबद्दल पूर्वग्रह दूषितपणे पाहिले जाऊ शकते. मात्र, आपल्या कामातून त्यांना प्रतिमा निर्माण करावी लागेल. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल (ता. 29) जिल्ह्याचा चार्ज सोडला. नवे पोलिस अधीक्षक लवकरच साताऱ्याचा पदभार स्वीकारतील. कधी नव्हे ते सातारकरांनी पोलिस अधीक्षकांची बदली रद्द करण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्या कामाचा सातारकरांवर पडलेला प्रभाव दाखवून गेला. के. एम. एम. प्रसन्ना यांनी रचलेल्या चांगल्या पोलिसिंगच्या पायावर संदीप पाटील यांनी कळस चढवला. प्रसन्ना यांनी पहिल्यांदा धाडसी पोलिसिंगचा पायंडा जिल्ह्यात घालून दिला. सर्वसामान्य माणूस केंद्रबिूंद ठेवून त्यांनी काम केले. कोणताही राजकीय दबाव न घेता काम केले. भल्याभल्यांना धडा शिकवण्यास त्यांनी सुरवात करून दिली. त्यानंतर अभिनव देशमुख यांनी अत्यंत संयमीपणे जिल्ह्याचा कारभार हाकला. प्रसन्ना यांच्यापेक्षा वेगळी कार्यपद्धती असूनही त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे महाराष्ट्रीय अधिकारीही ठोस पद्धतीने काम करू शकतो, हे दिसून आले. दोन वर्षांपूर्वी अभिनव देशमुख यांची गडचिरोलीला बदली झाली. त्यानंतर गडचिरोतून संदीप पाटील साताऱ्यात आले. 

किरकोळ देहयष्टीमुळे प्रथमदर्शनी त्यांचा समोरच्यावर प्रभाव पडेल, असे वाटत नव्हते. मात्र, हे अंदाज त्यांनी धुळीला मिळवले. त्यांचा "मोका' व तडीपारीचा मंत्र जिल्ह्यातील गुन्हेगारांवर रामबाण ठरला. खासगी सावकारांवरील "मोका'च्या कारवायांची अनेकांनी धास्ती घेतली. राजाश्रय असलेल्यांनाही त्यांनी सोडले नाही. सुरूची धुमश्‍चक्रीप्रकरणातही त्यांनी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे अनेकांना भूमिगत व्हावे लागले. पोलिसिंगच्या या कार्यपद्धतीचा सर्वसामान्यांवर चांगलाच प्रभाव पडला. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या कार्यपद्धतीने घर केले. भाजपच्या पॉलिसी राबवतात, हा आरोप त्यांच्यावर होत होता. मात्र, त्यांनी केलेल्या कारवायांमुळे सर्वसामान्यांच्या डोक्‍यावर मिरे वाटणाऱ्यांना जेलची हवा खावी लागल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. 

एकीकडे संदीप पाटील यांच्या कौतुकाच्या तर, दुसरीकडे पंकज देशमुख यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. या पोस्टला उस्मानाबादमधील अन्य पत्रकारांकडून दुजोरा मिळाला नाही. वैयक्तिक द्वेषातून ती लिहिल्याचे काही जण सांगतात. परंतु, जिल्हावासीयांच्या मनात देशमुख यांच्या कार्यपद्धतीबाबत ते येण्यापूर्वीच शंका निर्माण करण्याला ती पोस्ट कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे संदीप पाटील यांच्यापेक्षा उजवी कामगिरी करण्याचे आव्हान देशमुख यांच्यासमोर आहे. आपल्या कृतीतूनच त्यांना सातारकरांच्या मनात स्थान निर्माण करावे लागेल. 

पोस्टमध्ये उस्मानाबादमधील कामांचा उल्लेख 
पंकज देशमुख साताऱ्याचा पदभार स्वीकारणार आहेत. ते साताऱ्यात येण्यापूर्वीच एक वेब पोर्टलच्या बातमीची पोस्ट जिल्हाभर फिरली आहे. त्यामध्ये देशमुख यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. अवैध धंदे वाढले, गंभीर प्रकरणात ठोस कारवाई नाही, असा आशय त्यात आहे. त्यांच्या बदलीने उस्मानाबादकरांना आनंद झाल्याचे त्यात मांडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com