बदल्यांमुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सातारा - जिल्हा परिषद शिक्षकांच्या खांद्यावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानासह इतर विविध उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष निम्मे संपले असले तरी ऑनलाइन बदल्यांतील घोळ दिवसेंदिवस वाढत असल्याने, तसेच कोठेही बदली होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थितरतेचे वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम, या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेवर होणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळातून व्यक्‍त होत आहे. 

जिल्ह्यातील शाळांमध्ये संवर्ग एक आणि दोन, तीन आणि चारमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. संवर्ग एक आणि दोनमध्ये प्रामुख्याने ५३ वर्षांच्या वर असलेले शिक्षक, अपंग आणि मतिमंद मुले असलेल्या शिक्षकांचा समावेश होतो. ऑनलाइन बदल्यांचे आदेश फेब्रुवारीमध्ये निघाले होते. मात्र, त्यानंतरही बदली प्रक्रियेने वेग घेतला नव्हता. मे महिनाअखेरीस बदली प्रक्रिया वेगाने सुरू होत असतानाच बदल्यांतील अडचणी समोर आल्या. त्यामुळे ग्रामविकास विभागाने पुन्हा सप्टेंबरमध्ये सुधारित पत्रक काढले. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शिक्षकांच्या बदल्या होण्याची संभवना होती. मात्र, या बदली प्रक्रियेविरोधात विविध शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाने सप्टेंबरचा आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता शासनाला फेब्रुवारीच्या आदेशानुसार बदल्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली जात आहे. मात्र, सातत्याने सर्व्हर डाउन होत असल्याने अडचणी वाढत आहेत. शिक्षक दिवसभर अर्ज भरण्यासाठी बसले असतानाही अर्ज भरले जात नाहीत. त्यामुळे शिक्षकांना मनस्ताप होत आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरू असतानाच शिक्षकांची बदली दुसऱ्या शाळेत झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. दुसरीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान आणि शिक्षकांमार्फत राबविण्यात येणारे इतर उपक्रमही राबण्याची जबाबदारी सोपवत असते. ग्रामविकास विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणीच्या तोंडावर ही प्रक्रिया रेटण्याचे काम सुरू ठेवल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्‍त होत आहे.

शाळा होणार रिकाम्या 
ग्रामविकास विभागाच्या ऑनलाइन बदल्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील बऱ्याच शाळांमधील मुख्याध्यापकांचे पद सोडल्यास इतर शिक्षकांची बहुतांश पदे रिक्त होणार आहेत. यामुळे त्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिकवावे कसे, हा प्रश्‍न निर्माण होणार आहे. या प्रकाराने शाळा आणि विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होईल. 

Web Title: satara news teache confuse by transfer