प्राथमिक शिक्षकांकडून बदलीसाठी कायपण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सातारा - आधीच वादाचा विषय ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आता नवनव्या किश्‍श्‍यांची भर पडत आहे. विशेषतः बोगस अपंग दाखल्यांबरोबर पती-पत्नी संवर्गात शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याची चर्चा सध्या दबक्‍या आवाजात सुरू आहे. 

सातारा - आधीच वादाचा विषय ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आता नवनव्या किश्‍श्‍यांची भर पडत आहे. विशेषतः बोगस अपंग दाखल्यांबरोबर पती-पत्नी संवर्गात शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याची चर्चा सध्या दबक्‍या आवाजात सुरू आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार 31 मे या तारखेपूर्वी बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. तथापि, अगदी प्रारंभापासूनच हा नवा अध्यादेश वादाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. शिक्षकांच्या विविध संघटनांनी या अध्यादेशातील जाचक अटींविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. काही ठिकाणी बदल्यांना तात्पुरती स्थगितीही मिळाली. तोपर्यंत बदल्यांची तारीखही उलटून गेली. मात्र, शासनाने बदल्या होणारच अशी ठाम भूमिका घेतली. न्यायालयाकडूनही शासनाला "हिरवा कंदील' मिळाला. त्यातून बदली प्रक्रिया पुनश्‍च सुरू झाली आहे. 

अशा स्थितीत आता शिक्षकांत नवीच चर्चा रंगताना दिसत आहे. संवर्ग एकमध्ये स्थान मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी आपल्या बदली अर्जासोबत अपंगत्वाचे बोगस दाखले जोडले आहेत. या संवर्गातील शिक्षकांना बदली ऐच्छिक स्वरूपाची राहणार आहे. त्याचबरोबर अगदी त्या शाळेवर निवृत्तीपर्यंतही तो शिक्षक काम करू शकणार आहे. अशा बोगस दाखल्यांची प्रकरणे काही जिल्ह्यांत उघडकीस आली आहेत, तरीही काहींनी असे दाखले प्राप्त केल्याचे बोलले जात आहे. 

जी बाब बोगस दाखल्यांची, तीच पती- पत्नींच्या शाळा अंतराच्या माहितीबाबत चर्चात आहे. 30 किलोमीटर अंतराबाहेर असलेल्या पती- पत्नींना लगत क्षेत्रातील शाळा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकांची पाच ते दहा किलोमीटर अंतर असलेल्या शाळा चक्क 30 किलोमीटरच्या पुढे नेऊन ठेवल्या आहेत. या दोन्ही प्रकारांमुळे अन्य शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे त्यांच्यात संतप्त भावना आहेत. अशा बोगस प्रकारांच्या चर्चांमुळे बदली प्रक्रिया सध्या ढवळून निघाली आहे. याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याबाबतही शिक्षकांत उत्सुकता आहे. 

शिक्षक आक्रमक भूमिकेत 

ज्यांच्याकडे कोणतेच दाखले नाहीत, पती- पत्नी नियमातही जे बसत नाहीत, अशा शिक्षकांची सध्या मोठी गोची झाली आहे. त्यांची बदली प्रक्रिया सर्वात शेवटी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अर्थातच शेवटी शिल्लक राहिलेल्या शाळा येणार आहेत. असे "एकल' शिक्षक आक्रमक होत बोगस माहिती देणाऱ्यांची भांडाफोड करण्यासाठी एक होत आहेत. 

Web Title: satara news teacher transfer issue