टेलिमेडिसीन विभागाचा दीडशे रुग्णांना लाभ 

प्रवीण जाधव
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सातारा - रुग्णांच्या उपचारात तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेल्या टेलिमेडिसीन विभागाचा गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध आजारांच्या दीडशे रुग्णांना लाभ मिळाला. मात्र, जिल्ह्याबाहेर उपचाराला जाण्याची सर्वसामान्यांची परवड रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सुविधेचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

सातारा - रुग्णांच्या उपचारात तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेल्या टेलिमेडिसीन विभागाचा गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध आजारांच्या दीडशे रुग्णांना लाभ मिळाला. मात्र, जिल्ह्याबाहेर उपचाराला जाण्याची सर्वसामान्यांची परवड रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सुविधेचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्या ठिकाणी जाणे, राहणे व उपचाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णाच्या आवाक्‍याबाहेर असतो. त्याचबरोबर त्याला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. रुग्णाच्या नातेवाईकांचीही ससेहोलपट होत असते. या गोष्टी विचारात घेऊन आघाडी शासनाच्या काळात जिल्हा रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, जैविक अभियांत्रिकी व आरोग्यशास्त्र यांचा संगम या सुविधेमध्ये केला आहे. त्यामुळे रोगनिदान, औषधोपचार, रोगप्रतिबंधक उपाय व गरजू रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जिल्ह्याबाहेरील मोठ्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्ला मिळू लागला. त्याचा गेल्या काही वर्षांत अनेक रुग्णांना फायदाही झाला आहे.

अन्य विभाग मात्र टेलिमेडिसीन सुविधेचा लाभ घेण्यास अनुत्साही असल्याचे चित्र आहे. इतर विभागांनी दोन आकडी संख्याही गाठलेली नाही. एमडी मेडिसीन नसतानाही गेल्या आठ महिन्यांत मेडिसीन विभागाने केवळ सहा रुग्णांसाठी मदत घेतली आहे. सर्जरी विभागाने सात, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग चार, लहान मुलांच्या विभागाने पाच, लहान मुलांच्या सर्जरी विभागाने चार, प्लॅस्टिक सर्जरीसाठी तीन, न्यूरोलॉजीच्या आठ, डोळ्याच्या चार, कान-नाक-घशासाठी एक, युरोलॉजी दोन रुग्णांसाठी, तर नेफ्रालॉजीच्या एका रुग्णासाठी या सुविधेची मदत झाली आहे. एप्रिल महिन्यात ३२ रुग्णांसाठी या सुविधेचा लाभ घेण्यात आला होता. त्यानंतर या सुविधेचा वापर कमी होत गेलेला आहे. नोव्हेंबरमध्ये केवळ १५ रुग्णांनाच याचा लाभ झाला आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुविधेचा वापर वाढविणे आवश्‍यक आहे. त्यामुळ रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतात. त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना या योजनेचा वापर वाढविण्यासाठी उद्युक्त करणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यातील आठ महिन्यांतील स्थिती 
एप्रिल २०१७ पासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दीडशे रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. त्यात सर्वाधिक सल्ला हा त्वचा विकाराच्या २६ रुग्णांसाठी घेतला आहे. त्या खालोखाल छातीच्या आजाराशी संबंधित २३ रुग्णांसाठी या सुविधेचा वापर केला आहे. आयुर्वेद विभागानेही १९ रुग्णांसाठी टेलिमेडिसीन सुविधेचा वापर केला आहे. कान-नाक-घसा व रेडिओलॉजी विभागाने प्रत्येकी ११ रुग्णांवर या यंत्रणेच्या साह्याने उपचार केलेले आहेत. 

Web Title: satara news telemedicine department