‘थर्टीफर्स्ट’चा उन्माद नको!

शैलेन्द्र पाटील
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सातारा - नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र जोशात सुरू आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे डेस्टीनेशन-मेन्यू ठरविला जात आहे. संभाव्य डेस्टीनेशन व त्या ठिकाणी होणारे राडे टाळण्यासाठी पोलिस त्यांच्या पातळीवर खबरदारी घेत आहेतच. मात्र, प्रत्येकानेही आपल्या अल्पकाळच्या आनंदासाठी निसर्गाचे व पर्यायाने आपलेच नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. 

दिवस साजरे करण्याची पाश्‍चात्य संस्कृती रुढ झाली असून, ‘थर्टीफर्स्ट’ हा त्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. खाण्या-पिण्याचे पॅकिंग घेऊन घर-कुटुंबापासून दूर जाऊन मित्रमंडळींसोबत धिंगाणा घालण्याची संस्कृती उदयास आली आहे. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, टपावर बसून वेगात वाहन चालविणे, अजिंक्‍यतारा, ठोसेघर, यवतेश्‍वर घाट, पेढ्याचा भैरोबा, कास रस्ता, यवतेश्‍वर पठार, कास पठार, कास तलाव परिसर आदी ठिकाणे धिंगाणा घालण्यासाठी महत्त्वाची डेस्टीनेशन असतात. निसर्ग आवडत नाही, असा प्राणी दुर्मिळातील दुर्मिळ मानावा लागेल. त्यामुळे निसर्गात जाण्यात गैर काहीच नाही. मात्र, हे करत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही. आपल्यामुळे अशा ठिकाणी कचरा आणि विघटन न होणारा प्लॅस्टिक कचरा पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

चरायला येणारी गुरे, वन्यजीव खरकट्या अन्नपदार्थांच्या वासाने त्याला तोंड लावतात व प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाते. निसर्गात पडलेल्या प्लॅस्टिकच्या कागदाचे विघटन व्हायला २५ ते ३० वर्षांचा कालावधी कमी पडतो. मग मुक्‍या जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकचा थर साचल्यानंतर त्या जनावरांची काय अवस्था होत असेल, याचा विचार करायला हवा. प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने वर्षानुवर्षे ते तसेच पडून राहते व निसर्गाचे विद्रूपीकरण होते. कोल्ड्रींक्‍स, पाण्याच्या बाटल्या, ग्लास, पत्रावळ्या-द्रोण, कॅरिबॅग, खाद्यपदार्थांसाठी वापरलेले कंटेनर, चॉकलेट-कॅडबरी-बिस्कीट पुडे आदींचे वेस्टन या माध्यमातून प्लॅस्टिक निसर्गात पडत आहे. कास रस्ता, कास तलाव व पठार भागात असा कचरा वाढत आहे.

सुजाण सातारकरांकडून अपेक्षा
उघड्यावर कचरा टाकणार नाही 
प्लॅस्टिकचा वापर कटाक्षाने टाळणार 
कचरा ओला-सुका वेगळा करून घंटागाडीतच टाकणार
उघड्यावर शौच किंवा लघवी करणार नाही

Web Title: satara news thirty first celebration