'टोलनाक्‍याऐवजी जनतेच्या मुद्‌द्‌यांवर उठाव करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सातारा - साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी जनतेचे मुद्दे घेऊन उठाव करायला हवा. त्याऐवजी टोलनाक्‍यासारख्या किरकोळ बाबीत लक्ष घालून ते ठेकेदारांच्या पातळीवरील भांडणात सहभागी झालेत. मुळात छत्रपतींच्या परंपरेत बसणारा हा संघर्ष नाही. त्यामुळे दोघांनी हा प्रकार थांबवून छत्रपतींच्या तत्त्वावर व मुद्‌द्‌यांवर पुढे वाटचाल करावी. सातारकर जनतेला प्रतिनिधित्व करण्याची वेळ आणू नये, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. 

टोलनाक्‍याच्या ठेक्‍यावर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना डॉ. पाटणकर म्हणाले, ""सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहू महाराज यांच्या देदीप्यमान परंपरा लाभल्या आहेत. छत्रपतींच्या परंपरेत जीव खाऊन संघर्ष करायचा असेल तर तो परंपरेत बसणारा असावा. छत्रपतींनी सरमंजामशाही, जमीनदारी नष्ट केली. ही परंपरा पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन्ही राजांनी संघर्ष करायला हवा. मुळात छत्रपतींच्या वंशजांनी महाराष्ट्र संघटित करायला हवा, पक्ष बघून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ यावर नवा पर्याय घेऊन पुढे आले तर महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने जनता त्यांच्यासोबत येईल. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे. जनतेचे मुद्दे घेऊन उठाव करावा. हे सर्व आता सातारकर जनतेने त्यांना सांगायला हवे. अन्यथा अशा संघर्षात जनताही भरडत जाईल.'' छत्रपतींच्या देदीप्यमान परंपरेविषयी आदर म्हणून जनता मते देते, अन्यथा जनतेला प्रतिनिधित्व करण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 

डॉ. पाटणकर म्हणाले, ""दोघांनीही हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला, तर श्रमिक मुक्ती दल त्यांच्यासोबत असेल. मुळात टोलनाके नको होते. कारण वाहनांचा कर भरला जातो, त्यातूनच रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे व्हायला हवीत. ती संबंधित कंपनीकडून होत नाहीत, तरीही टोल वसुली होत आहे.'' या वेळी चैतन्य दळवी, संतोष गोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम उपस्थित होते. 

मुंबईत आता 14 नोव्हेंबरला आंदोलन 
श्रमिक मुक्ती दलाने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ता. 24 ऑक्‍टोबरला मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता; पण सध्या सुगीचे दिवस आणि पावसाळी वातावरण असल्याने हे आंदोलन तूर्त स्थगित केले असून, आता हे आंदोलन 14 नोव्हेंबरला होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतलेले कर्ज रद्द करावे, तसेच पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी आम्ही दिलेल्या उपाययोजना कराव्यात आदी मागण्या केल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

Web Title: satara news toll naka dr. bharat patankar