गृहमंत्री म्हणजे ‘पार्टटाइम जॉब’ नव्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

मायणी - भीमा कोरेगाव दंगलीस पोलिस जबाबदार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. राज्याचे गृहमंत्रिपद म्हणजे ‘पार्टटाइम जॉब’ नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद स्वतःकडेच ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आसूड ओढला.

मायणी - भीमा कोरेगाव दंगलीस पोलिस जबाबदार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. राज्याचे गृहमंत्रिपद म्हणजे ‘पार्टटाइम जॉब’ नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद स्वतःकडेच ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आसूड ओढला.

समाजप्रबोधन व स्त्री-पुरुष समानता रॅलीनिमित्त आयोजित येथील समारंभात तृप्ती देसाई बोलत होत्या. त्यावेळी व्यासपीठावर भूमाता ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस कांतीलाल गवारे, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार डोंबे, उज्वला शिंदे, विजया मोरे, तानाजी चव्हाण, सुभाष फल्ले, महेश पुस्तके, प्रशांत कोळी, रामभाऊ सोमदे, मनोज शिंदे, आशा फल्ले, सिद्धी देशमुख, प्रकाश सुरमुख, ललिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांचे कणखर, माघार न घेणारे नेतृत्त्व पुढे येऊ पाहत असेल तर त्या नेतृत्वाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची कुटिल नीती वापरली जात असल्याचे स्पष्ट करून देसाई म्हणाल्या, ‘‘प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ४०० वर्षांची परंपरा आम्ही मोडीत काढली आणि महिलांना शनिचे द्वार खुले केले. चौथरा व गाभाऱ्यातील महिलांच्या प्रवेशाने समानतेला सुरवात झाली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासह स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात खूप भरीव स्वरूपाचे काम कऱण्याची आवश्‍यकता आहे. मुलींना जन्मापासूनचा समानतेचा हक्क द्यायला हवा. मी हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही, अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी. समाजातील हुंडादर्दी, गुंडागर्दी व दादागिरी करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी ताईगिरी पथक तयार करण्यात आले. महिलांना महिलांविषयी सहानुभूती निर्माण होऊन त्यांना दारूबंदीसाठी संघटित करण्यात येत आहे. बिहार, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रही दारूमुक्त झाल्यास महिलांवरील अन्याय व अत्याचारांना आळा बसेल.’’ 

कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना देसाई म्हणाल्या, ‘‘कोल्हापूर, सांगलीत प्रचंड गुन्हे वाढले आहेत. दंगलीस सुद्धा पोलिसच जबाबदार आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांची हकालपट्टी करावी. गृहमंत्रिपद म्हणजे काय ‘पार्टटाइम जॉब’ नव्हे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सर्वत्र अस्वस्थता आहे. खून, दरोडे यासह माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. ज्या क्रांतिज्योतीने मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचे आयुष्य वेचले, शाळा सुरू केल्या, त्या माउलीच्या जयंतीदिनी दंगलीमुळे शाळा बंद झाल्या, हे दर्दैवी आहे.’’ 

कांतीलाल गवारे यांनी संघटनेची वाटचाल स्पष्ट केली. स्त्री-पुरुषांच्या समानतेसाठी, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी भूमाता ब्रिगेड नेहमीच सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वला शिंदे, प्रकाश सुरमुख यांनी मनोगत व्यक्त केले. राजकुमार डोंबे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: satara news trupti desai koregaon bhim riot devendra fadnavis