दूरचित्रवाणीची हौस बंद... हुशारीला वाव...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

रचनावाद पद्धतीने उमटविला ठसा; वैविध्यपूर्ण उपक्रमांसाठी शाळा व्यवस्थापन समितीही अग्रेसर

रचनावाद पद्धतीने उमटविला ठसा; वैविध्यपूर्ण उपक्रमांसाठी शाळा व्यवस्थापन समितीही अग्रेसर
सातारा - विद्यार्थ्यांना ‘टीव्ही’पासून दूर ठेवणे, ही पालकांसाठी डोकेदुखी ठरत असते. अभ्यासाचा वेळ टीव्ही मालिका पाहण्यात जातो आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. हे बदलण्याची किमया वाई तालुक्‍यातील एकसर येथील जिल्हा परिषद शाळेने केली. शाळा व्यवस्थापन समिती, पालकांच्या सहकार्याने ‘टीव्ही बंद’ उपक्रम राबविला आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या हुशारीला, कौशल्याला वाव मिळत गेला. रचनावादी पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील २५ तालुक्‍यांमधून तीन हजार लोक, शिक्षकांनी या शाळेला भेट दिली आहे. 

वाई शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर व डोंगराच्या कुशीत असलेल्या एकसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. त्यात ८७ पटसंख्या आहे. टुमदार इमारत, बोलका व्हरांडा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय आदी सुविधांनी शाळा सुंदर झाली आहे. त्यातच चार वर्षांपासून ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्याने शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली. ‘ग्राममंगल’ संस्थेच्या मदतीने पहिली ते चौथीसाठी ‘विकासघर’, तर पाचवी ते सातवीसाठी वर्ग अध्यापनाऐवजी ‘विषयकक्षां’ची सुरवात केली. बैठक व्यवस्था बदलून बेंचेस हद्दपार केले.

त्यावेळी पालकांची नाराजी दूर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला. त्यालाच पूरक म्हणून ‘टीव्ही बंद’ व रात्रअभ्यासिका उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. गावची ग्रामसभा होऊन त्यात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गावकऱ्यांनी टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने रात्रअभ्यासिका सुरू केल्या. शिक्षकांबरोबर सुपरव्हिजनचे काम शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्व:तहून स्वीकारले. तत्कालीन आयुक्‍त प्रभाकर देशमुख यांनी शाळेला भेट देऊन त्याचे कौतुक केले होते. 

ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे शाळेला भौतिक सुविधा दिल्या. एलसीडी प्रोजेक्‍टर, शिक्षक वाचनालयासाठी पुस्तके, प्रिंटर, कॅमेरा, हॅण्डवॉश स्टेशन, शाळेची रंगरंगोटी, संगणक कक्षासाठी फर्निचर आदी स्वरूपात ही मदत उपलब्ध झाली. शिवाय, ग्रामपंचायतीने पडीक असलेली ४७ गुंठे जमीन मैदानासाठी उपलब्ध करून दिली. विद्या परिषद पुणे व पंचायत समिती वाई यांच्या वतीने राबविलेल्या ‘प्रकल्प तालुका’ या उपक्रमात तालुक्‍यातील पहिल्या दहा शाळांत या शाळेची निवड झाली. 

रचनावादामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्‍वास निर्माण होऊन येथे भेट देणाऱ्या शिक्षकांबरोबर विद्यार्थी निर्भिडपणे संवाद साधू लागले. सर्वच विद्यार्थी वाचू, लिहू लागले. विविध स्पर्धांमध्ये हिरीरिने भाग घेऊ लागले. गट पध्दतीमुळे स्वयंशिस्त, समानता, सहकार्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांचाही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून हे एक आस्थेचे मंदिर झाले आहे. 

...हे गवसले
‘प्रगत शैक्षणिक’मध्ये १०० टक्‍के प्रगत
आयएसओ मानांकनप्राप्त शाळा
‘शाळा सिद्धी’त ‘अ’ श्रेणीसाठी प्रयत्न
पालकांचा शाळेवरचा दृष्टिकोन बदलला

Web Title: satara news tv close in eksar village