...आणि सातारा झाला ‘बंद’!

...आणि सातारा झाला ‘बंद’!

सातारा - खासदार उदयनराजे भोसले स्वत:हून शहर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर काही अवधीतच कार्यकर्त्यांचा लोंढा शहर पोलिस ठाण्याच्या दिशेने येऊ लागला. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण शहरात पसरली आणि सातारा ‘बंद’ झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शहरातील शाळा- महाविद्यालये सोडून देण्यात आली. बस व रिक्षा बंद असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.

शुक्रवारी रात्री उदयनराजेंचा शहरात रोड शो झाला होता. त्यानंतर पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे उदयनराजेंना हजर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज सकाळी साडेआठच्या सुमारास उदयनराजे अचानक शहर पोलिस ठाण्यात धडकले. पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहर व जिल्ह्यात पोचली. त्यामुळे उदयनराजे समर्थकांचे लोंढेच्या लोंढे शहराच्या विविध भागांतून शहर पोलिस ठाण्याकडे येऊ लागले. काही कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांतून रॅली काढून नागरिकांना ‘बंद’चे आवाहन केले. सोशल मीडिया व रॅलीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोचली. शुक्रवारच्या रोड शोतील गर्दीचा अनुभव ताजा होता. कायदा व सुव्यवस्थेचा बाऊ आधीच झालेला होता. त्यामुळे नागरिकांनी तातडीने दुकाने बंद करण्यात धन्यता मानली. 

थोड्याच वेळात शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. कार्यकर्त्यांचीच वाहने रस्त्यावर दिसत होती. शिवतेज येथे वैद्यकीय तपासणीसाठी जाताना उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. ‘सर्वांच्या परीक्षेची वेळ आहे. कोणताही अनुचित प्रकार करू नका,’ या त्यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांचा संताप कमी झाला. हा संदेश नेमकेपणाने शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचला गेला. राजपथावर एक एसटी बस फोडण्यात आली, तसेच वाढे फाटा येथे काही कार्यकर्त्यांनी केलेला रास्ता रोको वगळता कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही. दरम्यानच्या कालवधीत उदयनराजे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधील तणाव आणखी निवळला. त्यानंतर उदयनराजेंना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते तेथे येत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला छावणीचे रूप आले होते.

अचानक झालेल्या बंदमुळे शहरातील संपूर्ण बाजारापेठ बंद झाली. बस, रिक्षाही थांबल्या. हा प्रकार समजल्यावर शाळा- महाविद्यालयांनीही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. थोड्या उशिरा असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पालकांनी पाठविले नाही. मात्र, सकाळी भरलेल्या शाळा व महाविद्यालये सोडण्यात आली. रिक्षा व बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायीच मुख्य बस स्थानकापर्यंत जावे लागले. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थ्यांचा लोंढा दिसत होता. मुख्य बस स्थानकातून एसटीही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्रवशांचेही हाल झाले. जिल्हा रुग्णालयातील गर्दीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागत होता. उदयनराजेंना वरच्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वच मजल्यावरील रुग्णांच्या नातेवाईकांना पोलिस चौकशीतूनच जावे लागत होते.

एसटी बंद झाल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
 शाळा- महाविद्यालयेही राहिली बंद
 रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे लोंढे 
 जिल्हा रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाईकांनाही त्रास
 जिल्हा रुग्णालयाला छावणीचे रूप
 बसची मोडतोड, वाढे फाट्यावर काही काळ ‘रास्ता रोको’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com