साताऱ्यात महिना अखेरपासून वाहनांचे पासिंग बंद

प्रवीण जाधव
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सातारा - नवीन व जुन्या वाहनांच्या पासिंगसाठी आवश्‍यक असणाऱ्या चाचणीसाठी लागणारा ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांचे पासिंग ३१ जानेवारीपासून बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ट्रान्स्पोर्ट वाहनांच्या पासिंगचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, तसेच नवीन वाहने रस्त्यावर कशी येणार याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सातारा - नवीन व जुन्या वाहनांच्या पासिंगसाठी आवश्‍यक असणाऱ्या चाचणीसाठी लागणारा ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांचे पासिंग ३१ जानेवारीपासून बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ट्रान्स्पोर्ट वाहनांच्या पासिंगचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, तसेच नवीन वाहने रस्त्यावर कशी येणार याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

माल किंवा प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना दर वर्षी पासिंग करावे लागते. त्यासाठी या वाहनांचे योग्यता चाचणी घ्यावी लागते. ही चाचणी घेण्यासाठी नियमानुसार आवश्‍यक असणारा ट्रॅक असावा लागतो. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अनेक गोष्टी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याबाबत २०१३ मध्ये एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेच्या सुनावणीत संबंधित विभागाला विविध उपाययोजनांची पूर्तता करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात नियमानुसार ट्रॅक असल्याशिवाय वाहनांचे पासिंग करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मोठी अडचण झालेली आहे.

सातारा कार्यालयाला सध्या टेस्टिंग ट्रॅक नाही. सध्या महामार्गावरील सेवा रस्त्यावर वाहनांच्या पासिंगची प्रक्रिया केली जात आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने ती बंद करावी लागणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत सेवा रस्त्यांवरील चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ट्रॅकशिवाय चाचणीला बंदी आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ३१ जानेवारीपर्यंतच वाहनांच्या पासिंगची आगाऊ नोंदणी घेतली आहे. त्यानंतर पासिंगला येणाऱ्या वाहनांचे करायचे काय असा प्रश्‍न कार्यालय प्रशासनाला पडला आहे. मात्र, त्यामुळे वाहन मालकांची मोठी अडचण होणार आहे. मोटारवाहन कायद्यानुसार पासिंग न करता वाहन रस्त्यावर चालविणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे नियमानुसार पासिंग योग्य मुदतीत न झाल्यास या वाहनांना व्यवसाय करता येणार नाही. ती उभीच ठेवावी लागणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे ४० हजार माल व प्रवासी वाहतूक वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, ट्रकपासून ते एसटीपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे. बरीच वाहने आंतरराज्य व्यवसाय करतात.

व्यवसाय सुरू ठेवायचा, तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पासिंग न झाल्याने वाहन मालकांचा व्यवसाय बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांची एकाच वाहनावर उपजीविका आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही निर्माण होणार आहे. यावर शासकीय पातळीवर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे.

चिंचणेर वंदनमधील जागेचा प्रस्ताव प्रलंबित
चिंचणेर वंदन येथे ट्रॅक उभारण्याच्या जागेचा प्रस्ताव शासकीय पातळीवर प्रलंबित आहे. त्यावर निर्णय होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर कऱ्हाड येथे ट्रॅक उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनांचे पासिंग कऱ्हाड येथे करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंतीही वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आली आहे. उपलब्ध होतील त्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: satara news vehicle passing close