साताऱ्यातील वाहनांची फरफट

प्रवीण जाधव
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

साताऱ्यात ४८ हजार व्यावसायिक वाहने 
सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत सुमारे ४८ हजार व्यावसायिक वाहने आहेत. नव्याने येणारी वाहने वेगळी. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या वाहनधारकांचा हा प्रश्‍न त्यांनी गांभीर्याने घेणे आवश्‍यक आहे. ट्रॅकच्या प्रश्‍नावर तातडीने मार्ग निघावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.

सातारा - टेस्टिंग ट्रॅकअभावी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांचे पासिंग थांबल्यामुळे वाहनचालकांची कऱ्हाडला फरफट होत आहे. ती थांबविण्यासाठी ट्रॅकचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावणे आवश्‍यक आहे.

लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने मार्ग काढणे आवश्‍यक आहे.

परिवहन विभागातील कार्यपद्धतीसंदर्भात २०१३ मध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रस्त्यावर वाहनांची फिटनेस टेस्ट घेण्यास बंदी घातली होती, तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना ३१ जानेवारीपर्यंत ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून घेण्यास सांगितले होते. अन्यथा संबंधित ठिकाणचे पासिंग बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यावसायिक वाहनांचे पासिंग बंद करण्यात आले आहे. 

वाहनधारकांची तात्पुरती सोय म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी कऱ्हाड येथे पासिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार येथील वाहनांचे कऱ्हाड येथे पासिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, साताऱ्यातून कऱ्हाडला पासिंगसाठी वाहने नेण्यामध्ये वाहनधारकांची फरफट होत आहे. त्यांचा बराच वेळ व पैसाही खर्च होत आहे. वाहनधारकांचा हा त्रास थांबविण्यासाठी साताऱ्यातच ट्रॅकची सुविधा होणे आवश्‍यक आहे. ट्रॅकसाठी पूर्वीच्या जागेचा प्रस्ताव बारगळला आहे. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन कमी पडल्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच नागरिकांची परवड होत आहे. आता नव्या जागेचा शोध सुरू झाला आहे. मात्र, ट्रॅकच्या जागेचा शोध, प्रस्ताव व प्रत्यक्ष काम हा एकंदर प्रवास लालफितीच्या कारभारात अडकू नये, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.

अन्यथा वाहनधारकांची फरफट बरेच दिवस लांबण्याची शक्‍यता आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचे प्रयत्न झाले, तरच ट्रॅकचा विषय लवकर मार्गी लागू शकतो.

Web Title: satara news vehicle testing track rto