गांडूळ खत प्रकल्पातून होणार कचरा व्यवस्थापन 

विशाल पाटील
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सातारा - शहरांत दिसणारे कचऱ्यांचे ढीग ग्रामीण भागातही दिसत आहेत. त्यावर मात करण्याची किमया कऱ्हाड तालुक्‍यातील बनवडी ग्रामपंचायतीने केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करत केलेला गांडूळ खत प्रकल्प जिल्ह्यास दिशादर्शक ठरू पाहत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 65 गावांत हा प्रकल्प वर्षभरात यशस्वीपणे राबविला जाणार आहे. 

सातारा - शहरांत दिसणारे कचऱ्यांचे ढीग ग्रामीण भागातही दिसत आहेत. त्यावर मात करण्याची किमया कऱ्हाड तालुक्‍यातील बनवडी ग्रामपंचायतीने केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करत केलेला गांडूळ खत प्रकल्प जिल्ह्यास दिशादर्शक ठरू पाहत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 65 गावांत हा प्रकल्प वर्षभरात यशस्वीपणे राबविला जाणार आहे. 

कचरा समस्येचा विळखा आता गावांनाही पडू लागला आहे. गावांतील कचरा आता घंटागाड्यांद्वारे संकलित करून तो थेट नदी, ओढे अथवा डोंगराकडेला ढीग लावले जात आहेत. परिणामी, त्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्‌भवत आहेत. शिवाय, पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पाणी येऊन त्यातील बहुतांश कचरा पाण्यात मिसळून जलप्रदूषण वाढत आहे. कचरा समस्येवर उपाय राबविण्याचे आव्हान ग्रामपंचायतींपुढे उभे राहिले आहे. 

आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रकल्प 
स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) देशात तिसरा क्रमांक, तर जिल्हा प्रमाणित करण्यात राज्यात प्रथम ठरलेल्या जिल्हा परिषदेने आता या अभियानातील दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच घनकचरा व्यवस्थापनातही प्रभावीपणे काम करण्यासाठी पाऊल उचलले आहे. बनवडी येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयोग राबविला. त्याच धर्तीवर पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 65 गावांसह आठवडा बाजार भरत असलेल्या 137 गावांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जाणार आहे. 

चौदाव्या वित्त आयोगातून खर्च 
हा प्रकल्प उभारण्यासाठी बनवडीला सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला. हा खर्च करण्याची तरतूद 14 व्या वित्त आयोगात आहे. त्यातून संबंधित ग्रामपंचायतींना खर्च करायचा आहे. बनवडीने हा प्रयोग यशस्वी केल्याने तेथील खताला सध्या दहा रुपये किलोने मागणी आहे. शिवाय, ही ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतींचा कचरा विघटन करण्यासाठीही सक्षम आहे. या पद्धतीने मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग यशस्वी करून शेजारी लहान ग्रामपंचायतीही तेथे कचरा विघटन करू शकतात. 

बनवडीमध्ये प्रशिक्षण देणार 
बनवडीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला. घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी विभाग केले. त्यासाठी लोकांमध्ये कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती केली. प्रथम सदस्यही आपापल्या प्रभागात घंटागाडीबरोबर फिरत होते. त्यामुळे कमी कालावधीत त्यांना यश आले. हे पाहण्यासाठी या महिन्यात तालुकानिहाय ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवकांना बनवडी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी ही माहिती दिली. 

...ही आहेत 65 गावे 
नागठाणे, लिंब, खेड, शाहूपुरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, अतित, काशीळ, (ता. सातारा), तांबवे, आटके, चरेगाव, गोळेश्‍वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बुदुक, सदाशिवगड, बनवडी, सैदापूर, शेरे, वडगाव हवेली, वारुंजी (ता. कऱ्हाड), आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी (ता. फलटण), कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, वाठार-किरोली, वाठार स्टेशन (ता. कोरेगाव), शिरवळ (ता. खंडाळा), बुध, पुसेगाव, खटाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली-सिध्देश्‍वर, निमसोड, पुसेसावळी, औंध (ता. खटाव), कुडाळ (ता. जावळी), बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर (ता. वाई), दहिवडी, पळशी, गोंदवले बुद्रुक, बिदाल (ता. माण), तारळे (ता. पाटण). 

घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बनवडी ग्रामपंचायतीच्या धर्तीवर 65 गावांत वर्षभरात गांडूळ खत प्रकल्प राबविला जाईल. सांडपाणी पुनर्प्रक्रियेवरही भर दिला जाईल. प्रत्येक तालुक्‍यात दोन गावे मॉडेल म्हणून विकसित करू.  
- कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी 

Web Title: satara news Vermicomposting