राज्यातील शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

अजित पवारांकडून गरिबाची थट्टा 
मी गरिबाच्या घरात जन्माला आलो. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे मला बारावीला जे गुण मिळाले त्यावर आधारित डोनेशन देऊन डी. वाय. पाटील विद्यापीठात जाऊ शकत नव्हतो. ज्ञानेश्‍वर विद्यापीठ जे अभ्यासक्रम देते, तेथे प्रवेश घेतला. माझ्या आई-वडिलांना परवडले ते शिक्षण घेतले. गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे नाही, तो शिकला म्हणजे बोगस. ज्याचे काका मुख्यमंत्री आणि तो शिकला म्हणजे तो खरा, असे अजित पवारांना वाटत असेल, तर ही गरिबाची थट्टा आहे, अशी टीकाही अजित पवार यांच्यावर तावडे यांनी केली.

सातारा - ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट करायला दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कोणकोणत्या शाळा ताबडतोब दुरुस्त कराव्या लागतील, हे समजेल. सातारा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये काही खूप जुन्या आहेत. अत्यंत धोकादायक आहेत. त्या पाडून लगेच बांधाव्या लागतील, या दृष्टीने ग्रामविकास आणि शिक्षण विभाग काम करत आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नगरमधील दुर्घटना घडलेल्या शाळेची इमारत जीर्ण नव्हती, तर बांधकामातील भ्रष्टाचार होता. 2005 मध्ये इमारत बांधून ती 2017 मध्ये पडली, असे स्पष्ट करत तावडे म्हणाले, ""सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून त्याला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी, जिजाऊ माता, सिद्धेश्‍वर या तीन नावांची मागणी होत आहे. याचा निर्णय मंत्रिमंडळ घेत असते. मी नामांतर करत नसल्याचा समज पसरविला जात आहे. सोलापुरात तिघे आणि साताऱ्यात एकाने चुकीचे कृत्य केले. फार मोठा समुदाय त्यांच्या पाठीशी आहे, असे नाही. भावनिक होऊन ते येत असतात. चुकीच्या माहितीवर आंदोलन करत आहेत.'' 

मातृभाषेतून शिक्षण आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी 14 हजार मुले, तर आतापर्यंत 12 हजार मुले इंग्रजी, खासगी माध्यमातून सरकारी शाळांत दाखल झाली आहेत. विद्यार्थ्यांना नीट शिकवायचे असेल, तर त्याला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. ज्ञानरचना वाद जगाने स्वीकारला. पण, आपण खूप नंतर 2004 मध्ये कागदावर स्वीकारला. आता आम्ही दोन वर्षे तो राबवत असून, त्याचे परिणाम दिसत आहेत. राज्य सरकार पहिली ते चौथीतील मुलांना अत्याचाराबाबत जागृती करणारे शिक्षण देणार, तसेच किशोरवयीन मुलांना शारीरिक बदलाबाबत प्रशिक्षण दिले जाण्यासाठी समुपदेशन करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

राज्यभरात क्रीडाधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यासाठी बढतीचा प्रस्ताव असून लवकरच ही जागा भरल्या जातील. फुटबॉलला आम्हाला दहा लाखांच्या प्रतिसादाची कल्पना होती. मात्र, हा आकडा 30 लाखांवर गेला. "सेल्फी, व्हॉट्‌सऍप, व्हिडिओ गेम टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा' हा आमचा उद्देश होता. पण, तो अजित पवार यांना न कळल्याने दहा लाख फुटबॉल खेळल्याने काय झाले, आधी सराव केला पाहिजे, अशी टीका केली. महाराष्ट्र फुटबॉल ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष त्यात राजकारण आणत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन जास्त क्रीडा क्षेत्रात जास्त प्रगती करताना दिसत नाही, अशी टीकाही तावडेंनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news vinod tawde School Structure Audit