निर्भया पथकांची व्याप्ती वाढविण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जिल्ह्यात महिला, युवती सुरक्षितच राहाव्यात, मुलींना शिक्षण मिळावे, याबरोबरच त्यांचे आरोग्यही चांगले राहावे यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क आहे. मात्र, निर्भया पथकांची व्याप्ती वाढविण्याबरोबरच आजही स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या ग्रामीण महिलांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जिल्ह्यात महिला, युवती सुरक्षितच राहाव्यात, मुलींना शिक्षण मिळावे, याबरोबरच त्यांचे आरोग्यही चांगले राहावे यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क आहे. मात्र, निर्भया पथकांची व्याप्ती वाढविण्याबरोबरच आजही स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या ग्रामीण महिलांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

सातारा जिल्हा हा गेल्या काही वर्षांत विकासकामे राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. अनेक चळवळी येथे प्रथम प्रभावीपणे रुजल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या बचतगट चळवळीपासून ते मातृसुरक्षा योजनेपर्यंत अनेक योजना येथे योग्य प्रकारे राबविल्या गेल्या आहेत. शिक्षणाची सुविधा अगदी दुर्गम भागापर्यंत पोचविली गेली असल्याने शाळाबाह्य मुलेच काय मुलीही यावर्षी अगदीच नगण्य स्वरूपात आढळल्या आहेत. अंगणवाड्यांचे जाळे डोंगरदऱ्यांतही पसरले आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील छोट्या मुलींना एसटीच्या मोफत प्रवासाची सवलतही त्यांना शिक्षणाच्या  प्रवाहात ठेवण्यासाठी मोठी मदत करत आहे.
 
शिक्षणाविषयी आता जागृती झाली आहे. किंबहुना ग्रामीण महिलांनाही शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे आज शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. याबरोबरच आरोग्याबाबतही जिल्ह्यात विविध पातळ्यांवर शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रबोधन केले जात आहे. शासकीय आरोग्य योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोचविण्यासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागात प्रसूती हा मोठा गंभीर प्रश्‍न होता. मात्र, मातृसुरक्षा योजनेने या महिलांना मोठा हात दिला आहे. थेट रुग्णालयापर्यंत मोफत वाहनाची सोय झाल्याने उपजत मृत्यू, बालमृत्यूचे प्रमाणही घटले आहे. 

मुली आणि ग्रामीण महिलांत आरोग्याबाबत हेळसांड केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर उपाय म्हणून महिलांना हिमोग्लोबिनच्या गोळ्या पुरविल्या जातात. शिवाय माध्यमिक शाळांतही मुलींना गोळ्या पुरविल्या जातात. 

महिलांच्या संरक्षणासाठी शासनाने अनेक कायदे, योजना आणल्या आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी होण्याबरोबरच महिलांना बरोबरीचे जीवन जगण्याची संधी देण्याबाबत समाजात प्रबोधन होण्याची गरज आजही भासत आहे. दरम्यान, आज महिलांना स्वसंरक्षणाचे धडेही शाळा, महाविद्यालयांत दिले जात असून, त्यात युवती मोठ्या संख्येने सहभागी होतात, हे महिलांतील जागृतीचे आश्‍वासक चित्र आहे. 

विद्यार्थिनींची सुरक्षा...?
जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने निर्भया पथकांची स्थापना केली आहे. त्यांना कोठे मुलींच्या बाबतीत वावगे घडल्याचे समजताच ही पथके तेथे पोचतात आणि मुलींची काळजी घेतात. मात्र, आजही जिल्ह्यातील काही शहरांत आणि निमशहरी भागातील महाविद्यालयांतील मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना आजही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालय ते बस स्थानक या अंतरात त्यांना हा त्रास सहन करावा लागतो.

हिमोग्लोबिन समस्या 
मुली, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत नसल्याचे अनेक शिबिरांतून आढळते. महाविद्यालयांतून हिमोग्लोबिन तपासणीची शिबिरे घेतली जातात. मात्र, आहाराची पुरेशी काळजी न घेतल्याने त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे सातत्याने आढळते. माध्यमिक शाळांतून मुलींना हिमोग्लोबिनच्या गोळ्या मोफत दिल्या जातात. ग्रामीण भागातील महिलांमध्येही हिमोग्लोबिन कमी असल्याचे आढळते. यासाठी प्रभावी प्रबोधनाची गरज आहे.

Web Title: satara news vision 2018 women