हेल्मेट राहू द्या... अवैध धंद्यांकडे बघा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

सातारा - हेल्मेटसक्तीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सातारकर चांगलेच धास्तावले आहेत. कोणत्याही शहराच्या परिसरात हेल्मेटसक्तीचा अजेंडा राबविणे यापूर्वीही यशस्वी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यापेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवसेना आणि शेतकरी संघटनेने तर या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा - हेल्मेटसक्तीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सातारकर चांगलेच धास्तावले आहेत. कोणत्याही शहराच्या परिसरात हेल्मेटसक्तीचा अजेंडा राबविणे यापूर्वीही यशस्वी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यापेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवसेना आणि शेतकरी संघटनेने तर या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काहूर उठले होते. शहरांच्या परिसरात या कायद्याच्या अंमलबजावणीला नागरिकांकडून तीव्र विरोध झाला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्तीचा निर्णय शासन व पोलिसांना गुंडळावा लागला होता. गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये हेल्मेट सक्तीच्या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी झाली नाही. नागरिकांचे सहाकार्य व मानसिकता नसेल, तर कोणत्याही कायद्याची रस्त्यावर प्रभावी अंमलबजावणी होत नाही, हे यातून प्रकर्षाने जाणवले होते. त्यामुळे कागदोपत्री कारवायांपुरते दर वर्षी महामार्गावर काही दुचाकी चालकांवर हेल्मेट बाबतच्या कारवाया होत होत्या. शहरांमध्ये एक-दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी हेल्मेटचा बोजा वागवण्यापासून सर्वसामान्यांची सुटका झाली होती. मात्र, विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशाने हेल्मेटचा भार पुन्हा सर्वसामान्यांच्या माथी येणार आहे. त्यांच्या आदेशामुळे १५ जुलैपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा शहर वाहतूक शाखेनेही जोरदारपणे केली आहे. मात्र, सातारा शहरातील रस्ते, शहराचा एकूण परीघ, सर्वसामान्य नागरिकांच्या शाळा, नोकरी, बाजार यासाठीचा एकंदर प्रवास याचा विचार करायचे भान शहर वाहतूक शाखेला असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या या निर्णयाविरुद्ध संतापाची तीव्र लाट उसळताना दिसत आहे.

सर्वसामान्यांच्या या भावना विचारात घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला पोलिस दलाला दिला आहे. आज शिवसेनेनेही शहर व ग्रामीण भागातील हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘‘हेल्मेट सक्तीचा विषय उपप्रादेशिक परिवहन विभाग पाहून घेईल. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यापेक्षा अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करावे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दारूविक्रीला बंदी केली आहे,

तरीही जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम दारूविक्री होत आहे. त्याकडे पोलिसांचे लक्ष नाही.’’  विशेष महानिरीक्षकांचा हा निर्णय नागरिकांना वेठीस धरणारा आहे.  याबाबत लवकरच पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरिदास जगदाळे म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडचे अतिक्रमण व भोंगे काढायला पोलिसांना जमत नाही. नागरिकांच्या मागे कशाला लागता?’’

हेल्मेटसक्तीबाबत तुम्हाला काय वाटते?
शहर व ग्रामीण भागात हेल्मेट सक्तीला नागरिकांकडून विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे व शिवसेनेनेही या निर्णयाला विरोध करणारी भूमिका घेत फेरविचाराचे आवाहन केले आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबाबत काय वाटते, हेल्मेट सक्ती का नको, याबाबत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया ५० शब्दांत व्हॉटस्‌ॲपवर (७७२१९८४४४१) या क्रमांकावर किंवा लेखी स्वरूपात सकाळ कार्यालयात आपल्या नावासह द्यावात.

नागरिकांच्या पोलिसांना कानपिचक्‍या

हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध 
शिवसेना, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

नागरिकांचे पोलिसांना काही प्रश्‍न...
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी साताऱ्यातील अतिक्रमणे आठ दिवसांत काढण्याचा आदेश  दिला होता. त्याचे काय झाले?
शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग का निघत नाही? 
रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत, त्यावर पोलिस काय करतात?
खासगी सावकारांनी शहर व जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यांचा बीमोड करणे होतेय का?
मटका व जुगार अड्डे शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यावर पोलिस काय करणार?
दंड वसुलीचेच काम पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे काय?
बेकायदेशीर गोष्टींचा बीमोड करायचे सोडून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन हराम का करता? 

नांगरे पाटीलांनी फेरविचार करावा - गोडसे
शेतकरी आधीच कर्जमाफीच्या दररोज बदलत्या निकषाने त्रस्त झालेला असतानाच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सातारा जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे खुळ आणले आहे. ही सक्ती लोकांच्या सुरक्षिततेसाठी की हेल्मेट कंपनीच्या नफ्यासाठी? ग्रामीण व शहरी भागाला हेल्मेट सक्तीतून वगळण्याबाबत विचार व्हावा; अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिला आहे. नांगरे पाटील हे टाटा, बिर्लांचा मुलगा नाही, शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यांना शेतकऱ्यांचे हित पाहायचे, की हेल्मेट कंपनींच्या नफ्याचे हित पाहायचे आहे. शेतकरी व त्याच्या मुलाने शेतात जातानाही हेल्मेटचा वापर करायचा का, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. गोडसे म्हणाले, ‘‘हेल्मेट सक्तीचा नांगरे पाटीलांनी फेरविचार करावा; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.’’

Web Title: satara news watch illegal businesses