"जलसंधारण'चा सवतासुभा एप्रिलमध्ये! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सातारा - कृषी विभागातून जलसंधारण विभाग बाजूला करून त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही देण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष काम मात्र, अद्याप सुरू झालेले नाही. आजही कृषी विभागाचेच अधिकारी व कर्मचारी जलसंधारणाचे काम पाहात आहेत. पण, येत्या एक एप्रिलपासून या विभागाचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू होण्याचा शासनाने मुहूर्त काढला आहे. हे खरेच आहे की "एप्रिल फुल' आहे, हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. 

जलयुक्त शिवार, जलसंधारण आणि पाणलोट हे सर्व घटक कृषी विभागाला जोडले गेले होते. पण, यातून "कृषी'च्या कामांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शासनाने जलसंधारण हा स्वतंत्र विभाग केला. त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही देण्यात आला. राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, पुण्यातील एक सेल वगळता या विभागाचे कामकाज अद्याप जिल्हास्तरावर स्वतंत्र झालेले नाही. आजही कृषी विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी जलसंधारण विभागाचे काम पाहात आहेत. या विभागाला केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे. सर्वाधिक निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे. विभाग स्वतंत्र झाला असला तरी जिल्हास्तरावर स्वतंत्र कामकाज सुरू झालेले नाही. केवळ कागदोपत्रीच हा विभाग स्वतंत्र झाला आहे. याबाबत शासन निर्णय निघणे, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे, या बाबी अद्याप बाकी आहेत. आतापर्यंत केवळ सेवा वर्ग झाल्या आहेत. 

जलसंधारणाच्या कामाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाव आहे. ही कामे आजवर कृषी विभाग, रोजगार हमी योजना आदींतून होत होती. सर्वाधिक जलसंधारणाची कामे ही जलयुक्तमधून झाली. पण, आता यापुढे ही कामे जलसंधारण विभागातूनच होतील. त्यासाठी हा विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी एक एप्रिलचा मुहूर्त शासनाने काढला आहे. मुळात एक एप्रिलला खरोखरच या विभागाचे काम सुरू होईल की, तेही एप्रिल फुलच असेल, हे मात्र गुलदस्तात आहे. 

Web Title: satara news Water conservation