शिरीष खुटाळे
शिरीष खुटाळे

तीन वर्षांत पाच लाख लिटर पाण्याची बचत

सातारा - ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे काम करत औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक शिरीष खुटाळे यांनी गेल्या तीन वर्षांत सुमारे पाच लाख लिटर पाण्याची बचत केली आहे. पर्जन्यजल साठवण व वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणी बचत आणि भूगर्भातील पाणीपातळी सुधारण्यास मदत आदी उपायांच्या माध्यमातून खुटाळे इंजिनिअरिंग व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्सने साताऱ्याच्या उद्योग क्षेत्रात उदाहरण घालून दिले आहे. 

सुमारे सव्वाशे कुटुंबांचा चारितार्थ चालवणाऱ्या साताऱ्यातील छोट्या उद्योगाची मुहूर्तमेढ १९८९ मध्ये रचली गेली. श्री. खुटाळे यांनी कल्पकतेने व मोठ्या जिद्दीने हा उद्योग वाढवला. ग्रीनको प्लॅटिनम रेटिंगसह विविध पुरस्कारांनी हा उद्योग सन्मानित झाला आहे. या यशामध्ये उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच बाळगण्यात आलेल्या पर्यावरणीय भानाचा मोठा वाटा आहे. या उद्योगाला रोज अडीच ते तीन हजार लिटर पाण्याची आवश्‍यकता भासते. औद्योगिक वसाहत हे पाणी पुरवते. दोन वर्षांपूर्वी श्री. खुटाळे यांनी रवींद्र सासवडे यांच्याकडून इमारतीस ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून घेतले.

छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीतील टाकीत साठवून त्याचा पुनर्वापर सुरू केला. पावसाळ्याचे तीन-साडेतीन महिने याच पाण्याचा प्रक्रियेसाठी वापर केला जातो. उद्योगात वापरून झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प श्री. खुटाळे यांनी उभारला. प्रक्रियेनंतर हे पाणी वाया जाऊ न देता बगीच्याला दिले जाते.  

छतावर पडणारे पावसाचे सर्व पाणी साठविण्याला जागेची मर्यादा आहे. पावसाचे जमिनीवर पडून वाहून जाणारे पाणी आपण इमारत बांधल्याने आडले आहे. त्याला जमिनीपर्यंत वाट करून दिली पाहिजे, या कर्तव्य भावनेतून खुटाळे उद्योगाच्या आवारात मॅजिकपिट बांधण्यात येत आहे. याद्वारे भूगर्भात हे पाणी सोडून दिले जाईल. त्याने जमिनीतील पाणीपातळी सुधारण्यास मदत होणार आहे. बगीच्याला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतो. कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता वाढवून खर्चाच्या पाण्यामध्ये बचत केली जाते. पर्यावरणाशी मैत्र राखण्याच्या या प्रवासात खुटाळे इंजिनिअरिंगने वीज, पाणी, कच्चा माल या नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. तशी आदर्श कार्यपद्धती त्यांनी राबविली आहे.

उद्योगात पर्यावरणाशी मैत्र राखणाऱ्या कार्यपद्धती अंमलात आणल्याबद्दल ‘खुटाळे’ व ‘सिनर्जी’ उद्योगाला भारतीय उद्योग महासंघाकडून (सीआयआय) ‘ग्रीनको प्लॅटिनम’ हा सर्वोच्च दर्जा मिळाला आहे.

गुणवत्तेच्या क्षेत्रातील आयएसओ ९००१ बरोबरच आयएसओ १४००१ हे पर्यावरणाचं उच्च मानक या उद्योगाला यापूर्वीच मिळाले आहे. साताऱ्यातील पहिलाच ३० किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून शाश्‍वत ऊर्जा स्त्रोतांचा अधिक वापर करून येत्या दहा वर्षांत ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनण्याचा श्री. खुटाळे यांचा मनोदय आहे.

गांधींच्या विचारांचा पगडा
‘पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळाली नसून, आपल्या भावी पिढ्यांकडून उधार मिळालेली आहे. ती मानवाची भूक भागवू शकेल, हाव नाही,’ या महात्मा गांधींच्या विचारांचा शिरीष खुटाळे यांच्यावर पगडा आहे. सुधारणा ही अखंड प्रक्रिया आहे. ती सुरूच राहणार. या प्रत्येक सुधारणांमागे ‘टीम’ असते. त्यामुळे आमच्या उद्योगाने मिळवलेले यश हे टीमचे यश आहे,’ असे शिरीष खुटाळे प्रामाणिकपणे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com