साताऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सातारा - नियोजनाच्या अभावामुळे सातारकरांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या उपशामुळे ‘याचं काढून त्याला’ अन्‌ ओरड झाली, की ‘त्याचं काढून याला’ या प्राधिकरणाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये टंचाईच्या तोंडावर असंतोषाचे वातावरण आहे. कृष्णा नदीवरील तात्पुरता बंधारा बांधायला दिरंगाई का? असा सवालही नागरिक विचारत आहेत.

सातारा - नियोजनाच्या अभावामुळे सातारकरांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या उपशामुळे ‘याचं काढून त्याला’ अन्‌ ओरड झाली, की ‘त्याचं काढून याला’ या प्राधिकरणाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये टंचाईच्या तोंडावर असंतोषाचे वातावरण आहे. कृष्णा नदीवरील तात्पुरता बंधारा बांधायला दिरंगाई का? असा सवालही नागरिक विचारत आहेत.

सातारा शहराचा पूर्व भाग आणि लगतच्या उपनगरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. शाहूपुरी, विलासपूर, खिंडवाडी, संभाजीनगर, खेड, पिरवाडी, संगमनगर आदी भागास प्राधिकरण पाणी पुरवते. कृष्णा नदीतून पाणी उपसून ते विसावा येथे शुद्धकरण केले जाते आणि तेथून पाणी नागरिकांना पुरवले जाते. सध्या नदीतील पाण्याची पातळी खालावली आहे. प्रवाह कमी झाल्याने नदीवरील जॅकवेलजवळ पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यात तूट येत आहे. 

टंचाईच्या तोंडावर कृष्णा नदीत, जॅकवेलजवळ बंधारा बांधून पाण्याचा प्रवाह वळविण्याची व्यवस्था प्राधिकरण करते. त्यामुळे नदीपात्रातील उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर केला जातो. अद्याप प्राधिकरणाने हा बंधारा घातलेला नाही. परिणामी पाणी उपशात तूट येत असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शाहूपुरीत कृत्रिम टंचाई होती. तांत्रिक दोष दूर करण्यात दीर्घकाळानंतर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. तोपर्यंत पात्रातील पाणी कमी झाल्याने पुन्हा एकदा शाहूपुरीवासियांना कमी प्रमाणात पाणी मिळू लागले. नागरिकांनी आंदोलनाचा दिलेला इशारा लक्षात घेऊन ऐन वेळी शाहूपुरीकरिता कोटेश्‍वर टाकीचे पाणी वाढविण्यात आले.

शाहूपुरीवासीय सुटकेचा निश्‍वास 
टाकत नाहीत, तोच सदरबझारमधील नागरिकांतून पाणी ओरड होऊ लागली आहे. दोन आठवड्यांपासून पाण्याचा दाब व वेळ कमी करण्यात आली असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.

पाण्याबाबत दुजाभाव नको - माळवदे
पालिकेचे माजी उपाध्यक्ष शंकर माळवदे यांनी सांगितले, ‘‘एकाचे पाणी काढून दुसऱ्यास देण्याची प्राधिकरणाची ही जुनी खोड आहे. यामुळे कोणाचेच समाधान होत नाही. सर्वांना समान पाणी मिळाले पाहिजे. शाहूपुरीला पाणी देताना आमच्या भागाचे पाणी कमी करायचे, हे चालणार नाही. प्राधिकरण मीटरने पाणीबिल आकारते मग, पुरेसे पाणी देण्याची त्यांची जबाबदारी आहे. पाण्याबाबत दुजाभाव केल्यास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.’’

Web Title: satara news water shortage