उलटा धबधबा पाहण्यास पर्यटकांची गर्दी  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

तारळे - गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, यावर्षी कमी पाऊस व वाऱ्याचाही वेग मंदावल्यामुळे अजूनही धबधब्याखाली कोसळणारे पाणी पठारावर उलटे फेकले जात नसल्याने आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होताना दिसते आहे.

तारळे - गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, यावर्षी कमी पाऊस व वाऱ्याचाही वेग मंदावल्यामुळे अजूनही धबधब्याखाली कोसळणारे पाणी पठारावर उलटे फेकले जात नसल्याने आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होताना दिसते आहे.

तारळे- पाटण मार्गावर सुमारे १४ किलोमीटरवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दर वर्षी पावसाला सुरवात झाली, की पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात. जुलै व ऑगस्ट महिने सडावाघापूर पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास निर्माण करणारे ठरत आहेत. त्यामुळे पठारावर दर वर्षी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी शेकडो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सडावाघापूर आणि परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते नैसर्गिक उधळण केली आहे. पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य अजून खुलते. या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तरुणाईबरोबरच महिला, पुरुष स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटक दाखल होत आहेत.

सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीपासून उलटा धबधबा पाहण्यासह पावसाळी पर्यटनासाठी तरुणाईसह अनेक कुटुंबे मोठी गर्दी करू लागली आहेत. दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की पर्यटक येथील उलटा धबधबा पाहण्यास दाखल होतात. पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते; परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. कड्यावरून खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते. दरीला जवळ करणारे धबधबे पाहण्यापेक्षा हा उलटा धबधबा पाहण्यास अनेक जण पसंती देतात. दररोज शेकडो गाड्यांमधून पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत. निसर्गाची ही अद्‌भूत किमया पाहण्यासाठी रविवार व सुटीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, पावसाचा जोर व हवेचा दाब असल्यास त्यांना उलट्या धबधब्याचे डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक दृश्‍य अनुभवयास मिळत आहे. अन्यथा धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटे- मोठे धबधबे यावरच समाधान मानावे लागत आहे.

कसे जाल आणि काय काळजी घ्याल... 
साताऱ्याकडून आल्यास सातारा- नागठाणे- तारळे- सडावाघापूर, तर कऱ्हाडकडून कऱ्हाड- पाटण- सडावाघापूर किंवा उंब्रजकडून उंब्रज- चाफळ- दाढोली- सडावाघापूर. तारळेपासून १४ किलोमीटर अंतर आहे. तारळे- पाटण बस आहे; पण स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. येथे हॉटेलची सोय नाही, तसेच पॉइंटकडे जाण्यासाठी दिशादर्शक नसल्याने गोंधळ उडतो. कड्याच्या बाजूस कोणतीही सुरक्षिततेचे साधन नसल्याने अती कड्याजवळ जाणे धोक्‍याचे ठरू शकते.

Web Title: satara news waterfall