भांबवली वजराई धबधबा आता पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

सातारा - कास जवळच्या भांबवली वजराई धबधबा येथील पर्यटन विकास आराखड्याच्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. सुमारे 95 लाख रुपयांचा हा आराखडा आहे. 

सातारा - कास जवळच्या भांबवली वजराई धबधबा येथील पर्यटन विकास आराखड्याच्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. सुमारे 95 लाख रुपयांचा हा आराखडा आहे. 

हा आराखडा वन विभागाने बनवला आहे. साताऱ्यापासून पश्‍चिमेस 34 किलोमीटरवर भांबवली हे साधारण 300 लोकवस्तीचे गाव आहे. शिकेकाई, हिरडा, कढीपत्ता या वनौषधी तसेच जांभूळ, गेळा, हिरडा, आंबा या वनस्पती मुबलक आहेत. उरमोडी नदीचा उगम कास वनक्षेत्रात झाला आहे. पुढे डोंगराच्या कड्यावरून पावसाचे पाणी पडून धबधबा तयार होतो. तीन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो. त्याची उंची 252 मीटर एवढी आहे. पावसाळ्यात हजारो पर्यटक भांबवलीला जातात. मात्र, भांबवलीपासून कच्च्या रस्त्याने दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. गवा, अस्वल, भेकर, मोर आदी वन्यजीव या भागात असल्याने त्यांचा परिणाम भाबवलीच्या शेती व्यवसायावर झाला आहे. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढल्यास स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक नागरिक व मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या एकीतून पाठपुरावा सुरू झाला. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. 

भांबवली पर्यटन आराखड्यानुसार मंजूर निधीतून पर्यटकांना धबधब्याचे अधिक चांगले व जवळून दर्शन घेता यावे, यासाठी ठोसेघरप्रमाणे निरीक्षण गॅलरी उभारण्यात येईल. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, बसण्यासाठी बेंच, झाडांभोवती कट्टे, निगराणीसाठी एक वॉच टॉवर, पार्किंगची व्यवस्था, आवश्‍यक ठिकाणी सुरक्षिततेसाठी रेलिंग आणि धबधब्यापर्यंत पर्यटकांना सोयीस्करपणे जाता यावे, यासाठी सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता व पायऱ्या आदी सुविधांची कामे मंजूर निधीतून करण्याचे नियोजन आहे. 

भांबवलीच्या पर्यटन विकासास चालना मिळाली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. नोकरीसाठी मुंबईला पळणाऱ्या आमच्या पुढील पिढ्यांचे मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबेल. एक चांगला निर्णय शासनाने घेतला आहे.

Web Title: satara news Waterfowl tourist