"मराठानगरा'त चक्क मिळते खुलेआम दारू! 

अंकुश चव्हाण
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कलेढोण - राज्यात "मराठानगर' या नावाने नावाजलेल्या गुंडेवाडी ऊर्फ मराठानगरात चक्क खुलेआम दारूविक्री सुरू असून, पोलिसांकडून त्याकडे काणाडोळा होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावातीलच एका वाळू व्यावसायिकाकडून ही दारूविक्री सुरू असून, भयभीत झालेले ग्रामस्थ त्याच्याविरुद्ध बोलण्यास तयार नाहीत. 

कलेढोण - राज्यात "मराठानगर' या नावाने नावाजलेल्या गुंडेवाडी ऊर्फ मराठानगरात चक्क खुलेआम दारूविक्री सुरू असून, पोलिसांकडून त्याकडे काणाडोळा होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावातीलच एका वाळू व्यावसायिकाकडून ही दारूविक्री सुरू असून, भयभीत झालेले ग्रामस्थ त्याच्याविरुद्ध बोलण्यास तयार नाहीत. 

गुंडेवाडीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करत "मराठानगर' असे नाव धारण केले. त्यानंतर मराठाक्रांती मोर्चाच्या निमित्ताने मराठानगर म्हणून राज्याला परिचित झाले. मुंबई, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणी झालेल्या मोर्चांत गावकऱ्यांना सन्मानाने बोलाविले. मात्र, याच मराठानगरात आज एका वाळू व्यावसायिकाकडून कधी खुलेआम तर कधी छुप्या पद्धतीने दारूविक्री होत असल्याने गावची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे "गाव तसं चांगलं; पण वेशीला टांगलं' अशी म्हणण्याची नामुष्की आली आहे. वेशीवरच्या चितळीतील महिलांनी दारूविरुद्ध एल्गार पुकारत दारूला हद्दपार केलेले असताना मराठानगरात दारूने प्रवेश केला आहे, तर शेजारच्या चितळीच्या महिलांनी काही महिन्यांपूर्वी मायणी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. 

दारूविक्री करणाऱ्या वाळू व्यावसायिकाच्या दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध कोणी उघड बोलताना दिसत नाही. याबाबत पोलिस कधीतरी तोंडदेखली कारवाई करत दारूविक्रेत्याच्या घरावर छापे टाकताना दिसत आहेत, तर कधी छाप्यात किरकोळ गुन्हा दाखल करून घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, चितळी, शेडगेवाडी, मोराळे, निमसोड, म्हासुर्णे आदी ठिकाणचे मद्यपी दारूअड्ड्यांवर पहाटेपासूनच हजेरी लावतात. अनेक जण दारूचा गुत्ता म्हणून शेजारच्याच घरात दारू आहे का? अशी खुली आरोळी देतात, तर कित्येक जण अड्ड्यावरच झिंगत बसल्याने सभ्य ग्रामस्थ व महिला नाक मुरडतात. आता होऊ घातलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ दारूबंदीची घेणार  निर्णय घेणार का असा प्रश्‍न परिसरातील गावांमधून विचारला जात आहे. 

शाळवात दारूच्या बाटल्या...  
संबंधित दारूविक्रेत्यास मालावर छापा पडणार, असे वाटल्यास तो आपला दारूचा माल कधी ज्वारीच्या तर कधी गव्हाच्या शेतात लपवून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती ग्रामस्थांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर "सकाळ'ला दिली.

Web Title: satara news wine