तंबाखूने दगावतात सेकंदाला आठ व्यक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

सातारा - तंबाखू हे जगात संहारक असे शस्त्र बनले आहे. जगभरात तंबाखू सेवनाने दरवर्षी 70 लाखांपेक्षा जास्त लोकांचा, तर भारतात सरासरी नऊ लाख लोक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. भारत हा तंबाखू उत्पादनामध्ये व तंबाखू सेवनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये तंबाखूचे सेवन केल्यामुळे प्रत्येक आठ सेकंदाला एक व्यक्ती दगावते. 

जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालानुसार भारतात 28.6 टक्‍के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवन करतात. त्यापैकी 10.7 टक्‍के लोक धूम्रपान करतात, तर 21.4 टक्‍के लोक धूरविरहित (तंबाखू व चुना मिसळून, मावा, मिश्री, गुटखा, खैनी आदी) तंबाखूचा वापर करतात. तंबाखूमध्ये दोन हजार 550 रासायनिक घटकांचा समावेश असून, त्यापैकी 69 पदार्थ थेट कर्करोगाला कारणीभूत ठरतात. 

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम  
प्राथमिक अवस्थेत पांढरे व लाल चट्टे येणे, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटात अल्सर, स्वादुपिंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग आदी अन्ननलिका व पचनसंस्थेसंबंधी आजार, स्वरयंत्र, श्वासनालिका, फुफ्फुसाचा कर्करोग, जुनाट कफ, अस्थमा, दम आदी श्वसनसंस्थेचे आजार, अतिउच्च रक्तदाब, हृदयरोग व इतर रक्त वाहिन्यांसंबंधीचे रक्तवहन संस्थेचे आजार, मोतीबिंदू, पुरुषांमध्ये नपुंसकता, स्त्रियांमध्ये गर्भधारणेची क्षमता कमी होणे, बाळाचे जन्मत: कमी वजन होणे, जन्मत- बाल मृत अवस्थेत जन्मू शकते, अकाली प्रसूती होणे, नवजात बालकाची फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी असणे आदी प्रजनन संस्थेसंदर्भातील आजार तंबाखू सेवनाने होतात, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

नो टोबॅको मॅरेथॉन रविवारी  
जागतिक तंबाखूविरोधी सप्ताह दहा जूनपर्यंत राबविण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय व सामाजिक संस्थांच्या वतीने साताऱ्यात रविवारी (ता. दहा) सकाळी सहा वाजता तंबाखूमुक्‍त दौडचे (नो टोबॅको मॅरेथॉन) जिल्हा शासकीय रुग्णालयापासून आयोजन केले आहे, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, डॉ. योगिता शहा यांनी दिली. 

Web Title: satara news World Tobacco Week