तरुणाईने बजावला हक्क

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

‘यिन’ प्रतिनिधींसाठी साताऱ्यात पाच महाविद्यालयांत निवडणूक; सव्वादोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

‘यिन’ प्रतिनिधींसाठी साताऱ्यात पाच महाविद्यालयांत निवडणूक; सव्वादोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

सातारा - ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) प्रतिनिधींसाठी शहर व परिसरातील पाच महाविद्यालयांत आज तरुणाईने उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये सुमारे सव्वादोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान करत आपल्या महाविद्यालयाच्या ‘यिन’ प्रतिनिधींवर निवडणुकीद्वारे शिक्कामोर्तब केले. निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्र आल्याने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा अनुभव ‘यिन’च्या निमित्ताने बहुतेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच घेतल्याने या प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांत कुतूहल असल्याचे दिसून आले.    

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’अंतर्गत महाविद्यालयांतील तरुणाईच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सातारा शहर व परिसरातील पाच महाविद्यालयांत उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व सावकार फार्मसी कॉलेज (जैतापूर) या ठिकाणी हे मतदान घेण्यात आले. निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी त्यांची ओळख करून देत निवडणूक लढविण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

निवडणुकीत मतदान करण्याचा उत्साह विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गटागटाने युवक आणि युवती येऊन रांगेत उभे राहून शिस्तबद्धतेने मतदान करत होते. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी रांगा लागवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.  

लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानातून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर उमेदवारासमक्ष प्राचार्यांच्या स्वाक्षरीने मतपेटीला सील केल्याने या प्रक्रियेतील पारदर्शकतेचे विद्यार्थी, प्राध्यापकांनी स्वागत केले. अनेक विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावला, तर काहींनी यापूर्वी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रावर हक्क बजावल्याचे सांगून ‘सकाळ’च्या ‘यिन’मुळे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी पहिल्यांदा मिळाल्याचा अनुभव सांगितला.

Web Title: satara news yin election