युवकांच्या रोजगारासाठी मंत्रालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करणार, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचा त्यांना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. यामुळे खोटारड्या सरकरावर आता युवकांचा विश्‍वास राहिलेला नाही. आगामी काळात युवकांना रोजगार न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते- पाटील यांनी आज येथे दिला. 

सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास वाढे फाटा येथून प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी संग्राम कोते - पाटील, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, प्रदेश सचिव बाळासाहेब महामुलकर होते. मोर्चात सहभागी झालेल्या सुमारे १०० दुचाकीस्वारांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादी भवन, पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे श्री. कोते- पाटील, श्री. शिंदे यांची भाषणे झाली. या वेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांना निवेदन दिले. त्या वेळी श्री. कोते- पाटील म्हणाले ‘‘निवडणुकीवेळी मोदींनी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करणार, असे आश्‍वासन दिले होते. आतापर्यंत दोन हजार युवकांनाही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. निवडणुकीपुरते युवकांना खोटे आश्‍वासन दिले गेले. शासकीय नोकरभरती बंद करून शासनाने युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.’’ सरकराने युवकांना रोजगार उपलब्ध न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. कौशल्य विकास योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेतील संस्थांना आवश्‍यक अनुदान मिळालेले नाही.’’

बुलेटच्या फटक्‍यांनी धडकी...
बेरोजगारीच्या प्रश्‍नावर काढलेल्या मोर्चात युवक लाख - सव्वालाख रुपये किमतीच्या दुचाकींसह सहभागी झाले होते. त्यात बुलेटची संख्या लक्षणीय होती. मोर्चादरम्यान बुलेटस्वार सायलेन्सरमधून अधूनमधून फटाक्‍यासारखा आवाज काढत होते. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा असलेल्या नागरिकांच्या छातीत धडकी भरत होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news youth employment mantralaya rally sangram kote patil