विद्येच्या प्रांगणात युवकांची टोळकी!

विद्येच्या प्रांगणात युवकांची टोळकी!

शाळा-महाविद्यालयांजवळच्या कोपऱ्यावर उभी राहणारी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची टोळकी हा शिक्षण संस्थांपुढील गंभीर प्रश्‍न होऊन बसला आहे. शिक्षणाचा संबंध गमावून बसलेले काही युवक चैन पडत नसल्याने शाळा, क्‍लासेस व महाविद्यालयांच्या कोपऱ्यांवर उभे राहिल्याचे पाहायला मिळतात. या ठिकाणी गर्दी-मारामारी ही नित्याची बाब झाली आहे. भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी शाळा भरण्या-सुटण्याच्या वेळात पोलिस गस्त, शिक्षण संस्थांच्या परिसरात नाक्‍यांवर सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपाययोजना गरजेच्या आहेत.

सा तारा शहराच्या मध्यवस्तीसह पश्‍चिम आणि पूर्व भागात शाळा, महाविद्यालये आहेत. शहरातील विद्यार्थी येथे शिकतातच. पण, जास्त संख्या ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आहे. अगदी कऱ्हाड, पाटण, कोयना, जावळी, वाई, महाबळेश्‍वर, कोरेगाव अशा विविध भागातील विद्यार्थीही येथील महाविद्यालयांत शिक्षण घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. येथे विद्यार्थ्यांच्या टोळक्‍यात भांडणे, मारामाऱ्या झाल्याच्या घटना फारशा घडलेल्या नाहीत. तरीही दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना विचार करायला लावणारी आहे. शहरातील मध्यवस्तीतील ‘नामांकित’ शाळेच्या दारात शाळकरी मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. सध्या शहरातील अनेक महाविद्यालयांच्या परिसरातील वातावरण काहिसे गढूळ आहे. येथे मुले किंवा मुलींना त्रास होतो, तो स्थानिक गुंडप्रवृत्तीच्या युवकांचा. बस स्थानकावर छेडाछेडीपासून ते मुलींच्या मागून टाँट मारत येणे, जवळून वेगात दुचाकी नेणे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. महाविद्यालय परिसरात रेंगाळत राहणे, 

महाविद्यालय कधी भरतेय, सुटतेय याची वाट पाहत बसणे, येणाऱ्या मुलींना काहीही बोलणे असे प्रकार सुरू असतात. सातारा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलिस प्रशासनाला बऱ्यापैकी यश मिळतंय. शहर आणि परिसरातील गुन्हेगारीवरही पोलिसांचा चांगलाच वचक आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची प्रशासनावर बऱ्यापैकी पकड असल्याने अनेक अवैध बाबींना लगाम बसला आहे. शाळा- महाविद्यालये, खासगी क्‍लासेसच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या युवकांच्या कोंडाळ्यांना लगाम घालण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्राला यापूर्वीच रामराम ठोकूनही नित्यनियमाने शैक्षणिक संकुलांच्या परिसरात काही ठराविक टोळक्‍यांचा वावर वाढला आहे. विद्यार्थ्याच्या जाण्या- येण्याच्या रस्त्यावरच ही टोळकी उभी असतात. या ठिकाणी माऱ्यामाऱ्यांचे प्रकार ही नित्याची बाब झाली आहे. हे युवक कोणाचेच ऐकत नाहीत. मध्यस्थी करायला गेल्यास उलट त्यालाच चोप दिल्याची काही उदाहरणे शहरात घडली आहेत. त्यामुळे इतर नागरिक या युवकांच्या भांडणात पडत नाहीत. त्यातून ही गुंडप्रवृत्तीच्या युवकांच्या टोळक्‍यांचे उपद्रवमूल्य आणखी वाढत आहे. अशा टोळक्‍यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

पालकांचीही जबाबदारी महत्त्वाची
या विद्यार्थ्यांना ताब्यात ठेवण्याची जबाबदारी जशी शाळांची आहे, त्याहीपेक्षा अधिक ती पालकांचीही आहे. आपला मुलगा शाळेत जाऊन काय करतो, शाळेच्या नावाखाली तो इतर उद्योग तर करत नाही ना, या पालकांची नजर असली पाहिजे. दुर्दैवाने ते घडत नाही आणि त्याचे परिणाम केवळ त्या कुटुंबालाच नव्हे, तर सर्व समाजाला सोसावे लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com