पटसंख्या सुधारली अन्‌ गुणवत्ताही! 

पटसंख्या सुधारली अन्‌ गुणवत्ताही! 

सातारा - इमारतीची झालेली दुरवस्था, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण यामुळे रोडावत चाललेल्या पटसंख्येत सुधारणा करण्याचा संकल्प शिक्षकांनी केला. त्याला ग्रामपंचायत, ग्रामस्थ, खासगी कंपन्यांनी सहकार्य केले आणि सुसज्ज इमारत उभी राहिली. मग, शिक्षकांनी गुणवत्तेचा मेरू उभा केली. ही स्थिती आहे शिरवळ (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेची. 

जिल्ह्यात प्रमुख औद्योगिक वसाहत बनलेल्या शिरवळमध्ये मोठमोठ्या कंपन्या असल्याने तेथे खासगी व्यवस्थापनांच्या शाळांचेही पेव फुटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर पटसंख्या टिकवण्याचे आव्हान आहे. येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेची अवस्था , तर 2014 पर्यंत अत्यंत खराब बनली होती. वरिष्ठ मुख्याध्यापक दत्तात्रक चव्हाण, शिक्षक व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हे चित्र बदलवण्याचे ठरविले. 2017 मध्ये शाळेचे रुपडेच पालटले आहे. शाळेत ग्रीन झोनची निर्मिती केली असून, बागेत वेगवेगळ्या फुलझाडांची रोपे लावली आहे. चाइल्ड फ्रेंडली (खेळणी) सुविधा असल्याने खासगी शाळांपेक्षाही उत्तम स्वरूप शाळेस प्राप्त झाले. शाळेत 13 वर्ग खोल्या असून, भिंतीवर आकर्षक चित्रे काढून परिसर सुशोभित केला आहे. मोकळ्या जागेतील फुटलेल्या फरशी काढून पेव्हर ब्लॉक बसविलेत. हात स्वच्छ देण्यासाठी हॅंडवॉश स्टेशन बसविले आहेत. मुलींना बसण्यासाठी उंची व वयानुसार बेंचेस उपलब्ध केले आहेत. मुलींसाठी सहा शौचालये बांधली असून, त्यात 24 तास पाण्याची सोय उपलब्ध आहे. 

ग्रामपंचायतीच्या मदतीने मुलींच्या सुरक्षिततेसाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेत. ए. सी. जी. केअर्स फाउंडेशनकडून (मुंबई) सात वर्गांसाठी ई-लर्निंगचे प्रोजेक्‍ट, सॉफ्टवेअर साहित्य व वॉटर प्युरिफायर मशिन दिले. ट्यूब प्रायव्हेट कंपनीने 20 हजारांची पुस्तके ग्रंथालयासाठी दिली. गोदरेज कंपनीने यशवंत प्रयोगशाळा अद्ययावत केली, शिवाय या कंपनीमार्फत सध्या शाळेत आरोग्य शिक्षण, गायन, संगणक शिक्षण दिले जात आहे. यासारख्या भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तेतही शाळेने प्रगती केली आहे. 2014 मध्ये 221 इतकी असणारी पटसंख्या आजही टिकवून ठेवली आहे. गतवर्षी खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळातून 15 मुली या शाळेत दाखल झाल्या. 

शाळेला हे गवसले... 
- "गुणवत्तापूर्ण शाळा'त जिल्ह्यात प्रथम 
- गोपनीय अहवालात अतिउत्कृष्ट शेरा 
- आयएसओ मानांकनप्राप्त शाळा 
- आबासाहेब वीर आदर्श शाळा पुरस्कार 
- तीन वर्षांत 40 लाखांचा लोकसहभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com