यंदाही गणवेशाची परवड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

सातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शालेय गणवेशात यावा, हा शिक्षण विभागाच्या हेतू बाजूला राहिला आहे. 

सातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शालेय गणवेशात यावा, हा शिक्षण विभागाच्या हेतू बाजूला राहिला आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेतील सामाजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना सरकारने अंमलात आणली. सुरवातीच्या प्रक्रियेमध्ये बदल करून गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर गणवेशाचे अनुदान अदा करण्याचा निर्णय घेतला. एका विद्यार्थ्याला 200 रुपये प्रती गणवेश याप्रमाणे दोन गणवेशासाठी 400 रुपये अनुदान मिळते. 2016 पर्यंत शालेय व्यवस्थापन समिती या गणवेशाची खरेदी करून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करत असे. त्यासाठी मिळणारा निधी जिल्हा परिषदेतर्फे संबंधित शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होता; मात्र 2017 पासून राज्य सरकारने गणवेशाचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. 

आता नव्या नियमानुसार प्रथम गणवेश खरेदी करून खरेदीची पावती शाळेत दाखविल्यानंतर खात्यात पैसे जमा होणार आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पालकांना दोन गणवेश एकाच वेळी खरेदी करणे अवघड बनले आहे. मोफत गणवेश खरेदी करा. नंतर पैसे मिळतील या शासन धोरणाचा गरीब पालकांना फटका बसत आहे. कुटुंबात दोन- तीन मुले शिक्षण घेणारी आहेत. त्यांच्यासाठी तर गणवेश खरेदी ही बाब अत्यंत अडचणीची बनली आहे. जिल्हा परिषदेकडे हे अनुदान प्राप्त असले, तरी अद्याप ते शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अनुदान मिळण्यासाठी वाटच पाहवी लागणार आहे. 

5.33 कोटींचे अनुदान  
गेल्या वर्षी दोन गणवेशासाठी 400 रुपये अनुदान दिले जात होते. या वर्षी त्यात वाढ करण्यात आली असून, प्रती गणवेशाला 300 रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील 88 हजार 869 विद्यार्थ्यांना गणवेशासाठी अनुदान दिले जाणार असून, त्यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेला पाच कोटी 33 लाख 21 हजार 400 रुपयांचे अनुदान दिले आहे. तालुकानिहाय गणवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी : जावळी 4042, कऱ्हाड 15283, कोरेगाव 7093, खटाव 8343, खंडाळा 5036, महाबळेश्‍वर 2451, माण 8035, पाटण 10175, फलटण 11831, सातारा 10406, वाई 6174.

Web Title: satara news zp school student uniform issue