सातारकरांनी व्याजापोटी भरले सव्वा कोटी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

आजवर १७ कोटींची करवसुली; थकीत कराचे व्याज २४ टक्‍क्‍यांवर 
सातारा - कराच्या चालू, तसेच थकीत रकमेवर पालिका जरी केवळ दोन टक्के व्याज आकारत असल्याचे सांगत असली, तरी व्याज आकारणीची चक्रवाढ पद्धत लक्षात घेता प्रत्यक्षात नागरिक भरत असलेले व्याज २४ टक्‍क्‍यांच्या पुढे जाते. पालिकेच्या तिजोरीत आजअखेर सुमारे १६ कोटी ७० लाख रुपये कर जमा झाला. त्यात तब्बल एक कोटी २३ लाख ६२ हजार ३९६ रुपये इतकी रक्कम व्याजातून जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

बहुतेक वेळा कौटुंबिक, आर्थिक अडचणींमुळे, तर काही वेळा आळस, दुसऱ्याचे पैसे वेळच्या वेळी न देण्याची प्रवृत्ती आदींमुळे थकबाकी राहते.

एक दिवस पालिकेच्या बिलावरील कराची रक्कम आणि त्यावर भराव्या लागणाऱ्या व्याजाच्या रकमेचा आकडा पाहिल्यानंतर गरगरायला होते. पालिकेचे सहायक वसुली अधीक्षक ए. एन. वणवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका अधिनियमानुसार थकीत करावर दरमहा दोन टक्के व्याज आकारणी केली जात असली, तरी प्रत्यक्षात दरमहा चार टक्के व्याज आकारले जाते. पालिकेचे मागणी बिल नागरिकाला मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर चालू रकमेवर दोन टक्के व्याज आकारणी होते. हे व्याज चालू रकमेतील निम्म्या रकमेवर आकारले जाते. ३१ डिसेंबरनंतर पूर्ण वर्षाच्या रकमेवर व्याज आकारले जाते. एक एप्रिलनंतर पूर्ण थकीत रकमेवर चार टक्के व्याज आकारणी केली जाते. ही व्याज आकारणी मुद्दल अधिक व्याजाची रक्कम व त्यावर व्याज अशी चक्रवाढ व्याज पद्धतीने केली जाते. 

व्याज आकारणीची ही पद्धत लक्षात न घेता लोक कराची थकबाकी ठेवतात आणि व्याजाची वाढत जाणारी रक्कम आवाक्‍याबाहेर गेल्यानंतर बिल चुकीचे म्हणून तक्रार करत बसतात. मिळकतदाराला मागणी बिल मिळाल्यानंतर बिलावरील तारखेनंतर एक महिन्यात कराची रक्कम जमा करावी. अशा नागरिकास पाणी, शिक्षण, रोजगार हमी हे कर वगळता उर्वरित करावर एक टक्का सवलत दिली जाते, असेही श्री. वणवे यांनी सांगितले. 

थकबाकीच्या वसुलीसाठी गेल्या महिन्याभरात सुमारे ५०० जणांना जप्ती वॉरंट बजावण्यात आली. त्यापैकी काही थकबाकीदारांकडून २५ दुकान गाळे व एक फ्लॅट सील करण्यात आला. थकबाकीपोटी ९१ कुटुंबांची नळ कनेक्‍शन तोडण्यात आली. अद्याप पालिकेला नऊ कोटी रुपये कर वसूल करायचा आहे. ३१ मार्चअखेर हा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

नियमानुसार चालू, तसेच थकीत रकमेवर व्याज आकारणी होते. प्रसंगी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावी लागते. व्याज व कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी वेळच्या वेळी कर भरून एक टक्का सवलतीचा फायदा घ्यावा.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका

Web Title: satara people interest paid 1.25 million