रिओमुळे मिळाले जवानाचे पिस्टल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सातारा पाेलिसांच्या श्वानाची कामगिरी. लाखाे रुपयांचा मुद्देमाल संशियतांकडून पाेलिसांनी केला हस्तगत.

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथे माजी सैनिकाच्या घरात झालेल्या चोरीचा छडा श्‍वान पथकामुळे लागण्यास यश आले आहे. त्याबद्दल श्‍वान रिओ व श्‍वान हस्तक श्रीकांत सोनावणे यांचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.

सैदापूर येथील सुभाष महादेव यमगर (रा. साई दर्शन कॉलनी, सैदापूर) यांच्या घरामध्ये 28 ऑक्‍टोबरला चोरी झाली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी माहिती दिल्यानंतर श्‍वान पथकातील श्‍वान रिओ, श्‍वान हस्तक हवालदार श्रीकांत सोनावणे, गजानन मोरे व चालक विजय निकम घटनास्थळी गेले.

या पथकाने घटनास्थळावरील सर्व बाबींचे निरीक्षण केले. त्यानंतर श्‍वान रिओला वास देण्यात आला. त्यानंतर त्याने थोड्याच अंतरावरील गोसावी वस्तीमध्ये जाऊन दोन- तीन घराभोवती चक्कर मारली. त्यानंतर तालुका पोलिसांनी या घराची तपासणी करून तेथे राहणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली.

या चौकशीत गुन्हा उघडकीस आला, तसेच चोरीला गेलेला पिस्तूल, रोख रक्कम व दागिने असा सुमारे तीन लाख 21 हजार 130 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हा गुन्हा उघडकीस आणण्यात श्‍वान पथकाची मदत झाली. त्यामुळे या पथकाचे अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेच्या निरीक्षकांनी अभिनंदन केले. 

पुण्यात ऑनलाइन वीजबिल भरताना फसवणुकीचा प्रकार उघडकीस 

सातारा : पुण्यातील उच्च दाब ग्राहकांची ऑनलाइन वीजबिलाच्या प्रकरणात फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ऑनलाइन वीजबिल भरताना महावितरणच्या उच्च दाब ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या पुणे येथील एका उच्च दाब वीजग्राहकाची बनावट ई- मेलद्वारे बॅंकेचे बनावट खाते क्रमांक व इतर माहिती कळवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. महावितरणच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

याप्रकरणी सायबर क्राइम, शिवाजीनगर (पुणे) पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उच्च दाब ग्राहकांना महावितरणने ई- मेलद्वारे कळविले आहे. सर्व उच्च दाब ग्राहकांना आरटीजीएस माध्यमातून वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या एस बॅंक व एसबीआय बॅंकेचा तपशील वीजबिलावर देण्यात येतो. यात लाभार्थी (Beneficiary) खातेधारक MSEDCL आहे. 

एस बॅंकेचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDCL ने सुरू होतो व एसबीआयचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDHT ने सुरू होतो. या सर्व बाबींची खात्री करूनच उच्चदाब ग्राहकांनी आपले वीज बिल RTGS द्वारे भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Dog Squad caught criminals