साताऱ्यात पावसाची शंभरी पार ; जनजीवन ठप्प

विशाल पाटील
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

महाबळेश्‍वरात तब्बल 4500 मिलिमीटर पाऊस; पाच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी.

सातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्‍के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्‍मिचेकडे स्थिती उद्‌भवली आहे. 
सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग पावसाचे आगार आहे, तर पूर्वेकडील भाग दुष्काळग्रस्त आहेत. तब्बल चार हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणारा महाबळेश्‍वरचा भाग आणि दुसरीकडे अत्यंत तूरळक पाऊस पडणारा माणचा भाग या जिल्ह्यातच आहे. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने पाऊस पडणार की दुष्काळ येणार, अशी चिंता सर्वांना लागली होती. मात्र, पाऊसाने उशीर केला असला तरी गत दोन आठवड्यांपासून मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. काल पासून पश्‍चिमेकडील भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. कोयनेसह सर्वच धरणे ओव्हरफूल झाली आहेत. कोयना धरणातून तब्बल एक लाख 10 हजार क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाटण, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूरमधील अनेक गावांत पूराचे पाणी घुसले आहे. या भागात प्रशासनाने हायअलर्ट ही जारी केला आहे. 
सातारा जिल्ह्याची पावसाची सरासरी 918.9 असून, आजअखेर 934.95 टक्‍के सरासरी पाऊस झाला आहे. पावसाचे जोर वाढत असल्याने त्यात आणखी वाढ होणार आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये सरासरीच्या दुप्पट चार हजार 500 मिलिमीटर इतका पाऊस झालाआहे. सातारा, जावळी, खंडाळा, पाटण, कऱ्हाड तालुक्‍यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. मात्र, दुष्काळी भाग असलेल्या व परतीच्या मान्सूनवर अवलंबून असलेल्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्‍यांत अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. 

आजवर पडलेल्या पावसाची सरासरीची तालुकानिहाय माहिती आणि कंसात वर्षभरातील सरासरीची आकडेवारी मिलिमीटरमध्ये : सातारा- 1301.66 (908), जावळी- 1560.55 (1603), पाटण- 1360.39 (1733), कऱ्हाड- 710.23 (632.1), कोरेगाव- 541.78 (642.6), खटाव- 331.58 (415), माण- 147.13 (442.8), फलटण- 174.89 (382), खंडाळा- 419.35 (416), वाई- 652.14 (710.3), महाबळेश्वर- 4798.26 (2223) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 11997.96 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara rain recorded more than 100 percent