वसुलीमध्ये ‘आरटीओ’अब्जाधीश!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सातारा - सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या आर्थिक वर्षामध्ये महसूल, कर व विविध कलमांनुसारच्या दंड वसुलीच्या माध्यमातून शासनाने दिलेले उद्दिष्ट पार करत तब्बल एक अब्ज रुपयांचा टप्पा गाठला आहे.

सातारा - सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या आर्थिक वर्षामध्ये महसूल, कर व विविध कलमांनुसारच्या दंड वसुलीच्या माध्यमातून शासनाने दिलेले उद्दिष्ट पार करत तब्बल एक अब्ज रुपयांचा टप्पा गाठला आहे.

शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये परिवहन विभागाचा समावेश होतो. वाहनांची नोंदणी, पासिंग, वाहन चालविण्याचे परवाने, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केले जाणारे विविध प्रकारे दंड या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन विभाग महसूल गोळा करत असतो. शासनाकडून प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी महसूल व दंड वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करत असला तरी, शासनाचे या विभागाच्या सक्षमतेकडे फारसे लक्ष नसते. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तशीच ती सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही आहे. तरीही कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात शासनाकडून मिळालेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०६. ७८ टक्के पूर्ण केले आहे.

सन २०१६-१७ मध्ये शासनाकडून ९४.५२ कोटी रुपयांचे महसूल वसुली उद्दिष्ट सातारा कार्यालयाला देण्यात आले होते. त्यापोटी तब्बल एक अब्ज ९३ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात फिरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी तसेच कर वसुलीचे काम करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वायुवेग पथकांची निर्मिती केलेली आहे. या पथकाला दंड वसुलीची दोन कोटी १७ लाख तर, कर वसुलीचे सहा कोटी ८५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या पथकाने दंड वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे. तर, पाच कोटी ७७ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. 

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वसुलीमध्ये क्षमतेपेक्षा जादा भार वाहने व अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी केलेली कारवाई व आकर्षक नोंदणी क्रमांकातून मिळणाऱ्या महसुलाचाही मोठा वाटा आहे. 

मागील आर्थिक वर्षात क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या ४२० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८४ लाख ४३ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी एक हजार ४७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७१ लाख १९ हजार ५८३ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच १८४ वाहनांची नोंदणी तर, २८१ वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली गेली आहे.

Web Title: Satara RTO office

टॅग्स