साताऱ्याची जागा ‘राष्ट्रवादी’च जिंकेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

सातारा - यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला जाण्यासाठी शरद पवार काल रात्री साताऱ्यात आले होते. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, ‘‘पक्ष सोडून गेलेल्या तीनही आमदारांनी मतदारसंघांतील कामे होत नसल्यामुळे भाजपमध्ये जात असल्याचे सांगितले आहे. सत्तेत असणारे लोक लोकप्रतिनिधींच्या रास्त कामांकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्याशी सूडबुद्धीने वागतात, असाच त्यातून निष्कर्ष निघतो. शासकीय यंत्रणेचा यापूर्वी इतका गैरवापर केला जात नव्हता. अगदी मनोहर जोशी व नारायण राणे हे मुख्यमंत्री असतानाही तसे झाले नाही. कामे होत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी जिल्ह्यातील अन्य सर्व लोक आमच्यासोबत आहेत. त्यांची नाळ मतदारांशी चांगली आहे. त्यामुळे त्यांना अडचण येत नाही. १९८० मध्येही यापेक्षा जास्त संख्येने आमदार पक्ष सोडून गेले होते. ५८ आमदारांपैकी ५२ लोक सोडून गेले होते. आम्ही केवळ सहाजणच राहिलो होतो. परंतु, जे सोडून गेले, त्यातील एकही जण नंतर झालेल्या निवडणुकीत निवडून आला नाही. आमच्या सर्व जागा पुन्हा भरल्या. त्याचप्रमाणे सातारा मतदारसंघही राष्ट्रवादीकडे राहील. या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा, हे लवकरच ठरवू. आताच माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत.’’

रामराजे व उदयनराजेंतील वाद माझ्या घरी मिटविण्यात आला होता. त्या दोघांनी गळाभेट घेतल्याचे मी पाहिले आहे. मला कार्यकर्ते सांगतात की, काही लोक रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन करतात. आता काही वाद असेल तर पाहावा लागेल, असेही एका प्रश्‍नाच्या उत्तरावर बोलताना ते म्हणाले. उदयनराजेंवर कोणती जबाबदारी देणार, यावर ते म्हणाले, ‘‘माझी परवा त्यांच्याशी भेट होणार आहे. त्या वेळी पुढील ठरवू.’’

मराठा मोर्चाच्या वेळी लाखो लोकांची मेगाभरती करणार असल्याचे राज्यकर्त्यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? मेगा नोकरभरतीची घोषणा हवेतच विरली. त्याचप्रमाणे पक्षांतराच्या मेगाभरतीचेही होईल.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara seat will win NCP says Sharad pawar