रायवळ आंब्याची चव यंदाही दूरच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

साखर आंबा, खोबऱ्या, महाआंबा, शेंदऱ्या, नारळ्या, केशऱ्या, खारक्‍या, लध्या, शेपवा अशा नावाने आंब्याच्या जाती लोकप्रिय आहेत. मात्र, खटाव तालुक्‍यातील दुष्काळी स्थितीमुळे अलीकडे या झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही ग्रामीण भागातील शौकीनांना रायवळ आंब्याची चव चाखता आली नाही. 

पुसेगाव (जि. सातारा) ः कमी आलेला मोहोर, हवामानातील वारंवारच्या बदलांमुळे बहुतांश रायवळ (गावठी) जातीचे आंबे यंदा आलेच नाहीत. मे महिना संपत आला; पण आवक नसल्याने उत्तर खटाव तालुक्‍यातील चवदार असलेला रायवळ आंबा अद्यापही लोकांना चाखता आलेला नाही. हापूस, पायरी व बदामी या वाणाच्या आंब्याची आवक बाजारपेठेत झाली आहे. 250 ते 400 रुपये डझन या दराने हे आंबे खरेदी करावे लागत आहेत. 

उत्तर खटाव तालुक्‍यातील बुध, डिस्कळ, पुसेगाव, राजापूर, फडतरवाडी, काटेवाडी, वेटणे, रणसिंगवाडी परिसरातील रायवळ आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात होती. साखर आंबा, खोबऱ्या, महाआंबा, शेंदऱ्या, नारळ्या, केशऱ्या, खारक्‍या, लध्या, शेपवा अशा नावाने येथील काही आंब्याची झाडे त्यांच्या वैशिष्ट्यामुळे लोकप्रिय आहेत. शेंदरासारखा रंग असणारा शेंदऱ्या आंबा स्वादाला हापूसपेक्षाही मधुर असल्याने एके काळी हा आंब्याने पुणे, सोलापूर बाजारपेठे काबीज केली होती. साल पिकल्यानंतर खारकीसारखा दिसणारा खारक्‍या आंबा, तर केसराचे प्रमाण जास्त असलेला आंबा केसऱ्या म्हणून ओळखला जातो. शापूच्या भाजीसारखा वास असणारा शेपव्या अशी त्याची खासियत आहे. कच्चा असताना खोबऱ्यासाखी चव असणारा खोबऱ्या आंबा आंबट नसल्याने कच्चा खाण्यासाठी तसेच लोणच्यासाठी काही लोक अजूनही वापरतात. 

आंब्याच्या हंगामात येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार या रायवळ आंब्याने केला जातो. चवदार आंबे आढीतून काढून पिकलेल्या आंब्यांची पाटी लोक पाहुण्यांसमोर ठेवतात; पण आज ही परिस्थिती राहिलेली नाही. हा भाग दुष्काळी असल्याने वारंवार पडलेल्या दुष्काळामुळे पाऊसमान कमी होऊन या भागातील बहुतांश आंब्याची झाडे 2000 पासून जळू लागल्याने आज या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. भूजल पातळी कमी होऊन पाण्याअभावी ही झाडे वटून गेली. या भागातील काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्याने काही भागांत रायवळ आंब्याची झाडे तग धरून आहेत. आज हापूस, पायरी आंब्यांचे गगनाला चढलेले दर पाहता गरीब वर्गाला रायवळ आंब्यांचाच आधार आहे; पण यावर्षी या आंब्याची आवक न झाल्याने तोही चाखणे दुरापस्त झाले आहे. 

 

सातारा : ...त्यानंतर विकता येणार नाही मद्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The taste of Raiwal mango is still far away