साताऱ्यातील दहशतवाद मोडून काढू - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

सातारा - साताऱ्याच्या जनतेसमोर सक्षम पर्याय उभा आहे. एक संधी द्यावी. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलू, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. स्थानिक दहशतवादही आम्ही मोडीत काढू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

सातारा - साताऱ्याच्या जनतेसमोर सक्षम पर्याय उभा आहे. एक संधी द्यावी. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलू, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. स्थानिक दहशतवादही आम्ही मोडीत काढू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचार कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माजी आमदार कांताताई नलावडे, डॉ. दिलीप येळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. भरत पाटील, अमित कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, बबनराव कांबळे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील, नगरसेवकपदाचे उमेदवार तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

मंत्री पाटील म्हणाले, ""सातारकरांना नागरी सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता, सर्वसामान्यांवर त्याचा बोजा पडू न देता महसूल कसा वाढेल आणि सातारा शहराचा विकास वेगाने कसा होईल, यावरच आमचा भर आहे. स्वच्छ पाणी, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा निर्मूलन त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील रस्ते याचा आम्ही प्राधान्याने विचार करणार आहे. आजवर साताऱ्यात शासनाकडून येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. सर्वसामान्य जनता हे जाणते. त्यामुळे भाजपला एकदा संधी द्यावी, नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार निवडून द्यावेत. शहराचा चेहरामोहरा बदलू.'' साताऱ्यात उद्योगधंदे वाढून तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल, याकडेही लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले. 

स्थानिक दहशतवादाच्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी देशपातळीवर सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्ध खंबीर लढ्याचा संदर्भ दिला. ते म्हणाले, ""साताऱ्यातही लोकशाही असणे अतिशय आवश्‍यक आहे. सत्ता आमच्याकडे आल्यास आम्ही येथील स्थानिक दहशतवाद मोडून काढू.'' 
 

ते घरातले भांडण...लवकर मिटेल 
भारतीय रिपब्लिकन पक्षाला डावलण्यात आल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "ते घरातले भांडण आहे. संध्याकाळपर्यंत मिटेल, रिपाइंही आमच्याबरोबर असेल.' त्यानंतर काहीच वेळात रिपाइंचे किशोर तपासे व अण्णा वायदंडे प्रचार कार्यालयात आले. त्यांची मंत्री पाटील, कांताताई नलावडे, डॉ. येळगावकर व साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर कमराबंद चर्चा झाली. काही वेळाने दीपक पवार यांनाही त्या खोलीत बोलावण्यात आले. बैठकीत वाद मिटविण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. त्यानुसार आज रात्री प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर रिपाइंची बैठक होणार असल्याचे समजले. मागण्या मान्य झाल्यास भाजपसोबत जाऊ, असे श्री. तपासे यांनी बैठकीनंतर सांगितले.

Web Title: Satara terrorism broke out chandrakant patil