पीक कर्ज वाटपात सातारा भारी 

विशाल पाटील
मंगळवार, 24 जुलै 2018

सातारा - खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बॅंकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, बहुतांश जिल्ह्यात उद्दिष्टाची पन्नाशीही गाठली नाही. मात्र, सातारा जिल्हा तब्बल 82 टक्‍के पीक कर्ज वाटप करून राज्यात भारी ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्याने 76 टक्‍के, तर हिंगोलीने सर्वात कमी 11 टक्‍के कर्ज वाटप केले आहे. 

सातारा - खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बॅंकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, बहुतांश जिल्ह्यात उद्दिष्टाची पन्नाशीही गाठली नाही. मात्र, सातारा जिल्हा तब्बल 82 टक्‍के पीक कर्ज वाटप करून राज्यात भारी ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्याने 76 टक्‍के, तर हिंगोलीने सर्वात कमी 11 टक्‍के कर्ज वाटप केले आहे. 

राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान हे खरीप पिकांवर अवलंबून असते. या काळात शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते, साधने उपलब्ध होण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी बॅंकामार्फत पीक कर्ज देण्यात येते. राज्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण, सहकारी बॅंकांना 43 हजार 342 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 15 जुलैपर्यंत अवघे 15 हजार 549 कोटी (36 टक्‍के) उद्दिष्ट साध्य झाले होते. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांना स्वतंत्र उद्दिष्ट आहे. मात्र, बहुतांश जिल्ह्यातील उद्यापही उद्दिष्टांची पन्नाशीही गाठली नाही. जिल्हा सहकारी बॅंकांची कामगिरी चांगली असली, तरी राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंका पीककर्ज वाटपात मागे असल्याची स्थिती आहे. 

सातारा जिल्ह्यातील बॅंकांनी मात्र 1411 कोटी 66 लाखांचे (84 टक्‍के) कर्ज वाटप केले. सातारा जिल्हा सहकारी बॅंकेने तब्बल 1134 कोटी 56 लाखांचे (उद्दिष्टाच्या 119 टक्‍के) कर्ज वाटप करून गौरवास्पद कामगिरी केली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र बॅंक- 70 कोटी (67 टक्‍के), बॅंक ऑफ इंडिया- 59 कोटी (59 टक्‍के), स्टेट बॅंक ऑफ इंडिया- 57 कोटी (54 टक्‍के) कर्ज वाटप केले. मात्र, आयडीबीआय बॅंकेने 90 कोटींपैकी 16.55 कोटी, बडोदा बॅंक- 36 कोटींपैकी 4.66 कोटी, कॅनरा बॅंक- 20 कोटींपैकी 1.46 कोटी, कॉर्पोरेशन बॅंक- 12 कोटींपैकी 85 लाख, सिंडीकेट बॅंक- 15 कोटींपैकी एक कोटींचे वाटप केले. आंध्र, कर्नाटक, कोटक महिंद्रा बॅंकांनी एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज दिले नाही. 

मेळाव्यातही बॅंका मागेच! 
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या पीक कर्ज देण्याबाबत राज्यभरात ओरड सुरू होती. सातारा जिल्ह्याने त्यात आघाडी घेतली असून, मागणी केलेल्या एक लाख 82 हजार 48 शेतकऱ्यांपैकी एक लाख 81 हजार 56 शेतकऱ्यांना 778 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 162 मेळावे घेतले. त्यात महाराष्ट्र बॅंकेने सर्वाधिक 65, त्यापाठोपाठ स्टेट बॅंकेने 46 मेळावे घेतले. मात्र, 21 बॅंकांनीही एकही मेळावा घेतला नाही. 

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मागे 
सातारा जिल्ह्याने 15 जुलैपर्यंत 82 टक्‍के, कोल्हापूर- 76 टक्‍के, सांगली- 60 टक्‍के, सोलापूर- 50 टक्‍के, पुणे जिल्हा- 46 टक्‍के, यवतमाळ- 45 टक्‍के कर्ज वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्याने 95 टक्‍के कर्ज वाटप केले असले, तरी त्यांचे उद्दिष्ट 185 कोटी इतके कमी होते. त्यात मुख्यमंत्र्यांचा नागपूर जिल्हा मागे राहिला असून, एक हजार 66 कोटींच्या उद्दिष्टांसमोर केवळ 382 कोटींचे (36 टक्‍के) वाटप केले आहे. 2015-16, 2016-17 मध्ये सलग दोन वर्षे राज्यात सर्वाधिक पीक कर्ज वाटप केल्याने जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाला आहे. 

Web Title: Satara top in crop loan allocation