सातारकरांची कोंडी! 

सातारकरांची कोंडी! 

सातारा शहराचे हृदय असलेल्या पोवई नाक्‍यावर ग्रेट सेपरेटरद्वारे "हार्ट सर्जरी' सुरू आहे. हे काम वाहतुकीचे कंबरडे मोडणारे आहे. सात रस्ते असलेल्या नाक्‍यावर न येताच शहरात गल्लीबोळात, जोडरस्ते धुंडाळावे लागत आहेत. पर्यायी रस्त्यांवरील अतिक्रमणे व वाहतुकीतील अडथळे "जैसे थै' असल्याने अडचणींत भर पडत आहे. त्याचा अनुभव आज आला. दिवसभर पोवई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीतून पोवई नाका मुक्त करण्यासाठी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी एकत्रित कार्यवाही केल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्था सुखकर होईल. 

पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे काम शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे ठरेल. हे काम वेगाने सुरू आहे. कामात अडथळा येऊ नये म्हणून एक एक मार्ग बंद केले जात आहेत. त्यामुळे सातारकरांना, प्रवाशांना त्रास होताना दिसतो. मात्र, ज्या मार्गांवरून वाहतूक वळविली आहे, त्या रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे, अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे सर्वाधिक त्रास होत असल्याचेच समोर येते. 

मोनार्क चौकात धोका 
कऱ्हाड बाजूकडील वाहतूक मोनार्क चौकातून हॉटेल महाराजाकडून वळविली आहे. जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या दारात रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, तर विरोधी बाजूला टपऱ्या, विक्रेत्यांचे कोंडाळे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आयते आमंत्रण मिळत आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी कोंडी सुटण्यास अर्धा-अर्धा तास लागतो. 

लोणार गल्लीत अतिक्रमणे 
शाहू चौकातून नाक्‍याकडे येणारी वाहतूक रविवार पेठ पोलिस चौकीजवळून गिते बिल्डिंगकडे वळविली आहे. मात्र, पोवई नाक्‍यावरून लोणार गल्लीतून पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी असतात. त्यातच विक्रेत्यांनी रस्त्याकडेलाच दुकाने मांडली आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने जाणे अडचणीचे ठरतेय. राजपथावरून करमणूक केंद्र व रविवार पेठ पोलिस चौकीमार्गे कर्मवीर पथावर जाणारे रस्ते तुलनेने अतिक्रमणमुक्‍त आहेत. 

खोकीधारकांचे दुतर्फा बस्तान 
शिक्षक बॅंकेपासून तहसीलदार कार्यालय रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पुन्हा पसरले आहे. या खोकीधारकांनी रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा बस्तान बसविले आहे. त्यातून वाहतूक पुढे जाणेही जिकिरीचे ठरत आहे. जिल्हा कारागृह ते खंडोबाचा माळ रस्त्यावर सुमारे 50 मीटर अंतरात दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. दुकानासमोरच ग्राहकांची वाहने उभी असतात. पारंगे चौक व मुख्य बस स्थानक या ठिकाणी विक्रेत्यांची अतिक्रमणे वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरतेय. या रस्त्यांवरून एसटी, अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघातांना निमंत्रण ठरत आहे. 

वाईमार्गे जावा कऱ्हाडला! 
महामार्गावरून साताऱ्यात येताना शिवराज फाटा, अजंठा चौक व बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे बॅरिकेट्‌स लावून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद केली आहे. या वाहनांना खेड अथवा वाढे फाटा चौकातून प्रवेश दिला आहे. विलासपूर, शाहूनगर, गोडोली येथील रहिवाशांना महामार्गावरून आपल्या घरी जायचे झाल्यास "वाईमार्गे कऱ्हाड' असा द्राविडी प्राणायाम घालावा लागतोय. केवळ एसटीसाठी हा रस्ता बंद करून मोनार्क चौकापर्यंत वाहनांना तेथून प्रवेश देणे शक्‍य आहे. या ठिकाणांवर वाहतूक पोलिसांमार्फत नियमनही झाले पाहिजे. 

या उपाययोजना करा...! 
* नगरपालिकेने दररोज अतिक्रमणे काढावीत 
* पर्यायी मार्गावरील पार्किंगसह अन्य अडथळे काढा 
* प्रत्येक वळण मार्गावर गर्दीवेळी वाहतूक पोलिस आवश्‍यक 
* पर्यायी व्यवस्थेची माहिती देणारा फलक रस्त्याकडेला हवा 
* पालिका, पोलिस व पीडब्ल्यूडीमध्ये समन्वय 
* पोलिसांकडून दंडात्मक कारवाईबरोबर वाहतूक नियोजन 

वाहतुकीतील अडथळे काढण्यासाठी सातारा पालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. पालिकेचे सहकार्य घेऊन ते काढले जातील. 
- एल. एन. वाघमोडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

वाहनधारकांनी फलकांवरील सूचनांचे पालन करण्यासह स्वयंशिस्त राखावी. अतिक्रमणे काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, पालिकेनेही पुढे यावे. 
- सुरेश घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com