खेळाडूंना प्रोत्साहानात्मक शिष्यवृत्ती 

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्ह्यातील प्रज्ञावंत खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी आता सातारा जिल्हा परिषददेखील सरसावली आहे. खेळाडूंना प्रोत्साहानात्मक क्रीडा शिष्यवृत्ती देणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामीण भागातील 59 महिला खेळाडूंना प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे एकूण एक लाख 47 हजार 500 रुपये प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात आले. हा निधी जिल्हा परिषदेच्या व बाल कल्याण विभागाने वितरित केला. 

खाशाबा जाधव, ललिता बाबर यांच्याप्रमाणे साताऱ्याचा झेंडा ऑलिंपिकच्या व्यासपीठावर फडकवावा अशी जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूची इच्छा असते; परंतु प्राधान्याने आर्थिक अडचण आणि पुरेशा प्रोत्साहानाच्या अभावामुळे सर्वांनाच हे शक्‍य होत नाही. खाशाबा आणि ललिता यांना ही आर्थिक परिस्थितीशी सामना करूनच मार्गक्रमण करावे लागले हे सर्वज्ञात आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीचे असलेल्या ग्रामीण भागातील सर्वाधिक खेळाडू राज्याच्या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशित झाले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सातारा जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुहास पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. श्री. पाटील यांनी क्रीडा शिष्यवृत्तीचा आराखडा तयार करून दिला.

प्राथमिक टप्प्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील महिला खेळाडूंसाठी लाखो रुपयांच्या निधीची तरतूद केली. क्रीडा शिष्यवृत्तीच्या आराखड्यानुसार सन 2014-15 ते सन 2016-17 या कालावधीतील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय ज्युनिअर क्रीडा स्पर्धा, महिला क्रीडा स्पर्धा अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक खेळ प्रकारात विशेष प्रावीण्य (प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक) मिळविलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती स्वरूपात प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये ऍथलेटिक्‍स, जलतरण, हॉकी, खो- खो, बेसबॉल, सॉफ्टबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, लॉन टेनिस, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, शूटिंग, कुस्ती, बॉक्‍सिंग, तायक्वोंदो, सायकलिंग, तिरंदाजी, रोप मल्लखांब, नेटबॉल, रग्बी, ज्यूदो आदी खेळ प्रकारांचा समावेश आहे. 

Web Title: Satara Zilla Parishad Sports player Scholarship