बारामतीच्या खलित्यात नाव कोणाचे? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सोमवारी (ता. 20) जिल्हा बॅंकेत होणार आहे. यात सर्वानुमते चर्चा करून दोघांची नावे खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना कळविली जातील. त्यातून एकाच्या नावाचा खलिता बारामतीहून मंगळवारी (ता. 21) येईल. अद्यापपर्यंत तरी फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी येत्या मंगळवारी (ता. 21) होत आहेत. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचाच होणार हे निश्‍चित असले, तरी अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. फलटणच्या निंबाळकर घराण्याचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना पहिल्यांदाच अध्यक्ष होण्याची संधी आली आहे. त्यामुळे त्यांचे नाव निश्‍चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर इतर आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतील; पण काही आमदारांनी एकाच घरात दोन लाल दिवे कशासाठी, पक्षाचा आमदार नसलेल्या मतदारसंघात अध्यक्षपदाची संधी द्यावी, असे फाटे फोडण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक इच्छुक आपापल्या आमदारांकडे अध्यक्ष पदासाठी हटून बसला आहे. हा हट्ट पूर्ण करण्यासाठी आमदारांची मुंबईत रामराजेंसोबत एक दोन दिवसांत बैठक होईल. सध्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सर्व जण व्यस्त असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे नाव निश्‍चित करण्यासाठी बैठकच होऊ शकलेली नाही. येत्या एक दोन दिवसांत मुंबईतच बैठक उरकून काही तरी निर्णय घेण्याच्या तयारीत आमदार आहेत. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. काही इच्छुक सदस्यही मुंबईकडे डोळे लावून बसले आहेत. सोमवारी (ता. 20) साताऱ्यात होणाऱ्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दोन व उपाध्यक्ष पदासाठी दोन सदस्यांची नावे अजित पवारांना कळवली जातील. त्यातून प्रत्येकी एक नाव बारामतीहून निश्‍चित होऊन निवडी दिवशी तासभर आधी कळविले जाईल. त्यामुळे बारामतीच्या खलित्यात आपलेच नाव यावे, यासाठी इच्छुकांना झुंजावे लागणार आहे. 

Web Title: satara zp NCP