सेवाभावी व्रत ‘अनंत’, चित्ती समाधान!

विशाल पाटील 
शुक्रवार, 6 जुलै 2018

सातारा - रात्री रुग्णाची तपासणी करावयाची असल्यास जादा दर...पैसा मिळवायचा असेल तर शहरात हॉस्पिटल पाहिजे... ही व्यावसायिकता आता वैद्यकीय पेशात रूढ होते आहे. मात्र, त्याचा लवलेशही मनाला स्पर्श न करता साताऱ्यातून ग्रामीण भागात २० वर्षे सेवा करणारे... रात्री-अपरात्री केव्हाही रुग्ण आला तरीही त्याला प्रसन्नतेने तपासणे... तब्बल ४२ वर्षे सेवाभावी व्रत जपत चित्ती समाधान असणारे डॉ. अनंत साठे.

डॉक्‍टर देवासारखा उभा राहतो, त्रासातून मुक्‍त करतो, म्हणून रुग्ण डॉक्‍टरला देव मानतात. पण, ते मिळविण्यासाठी सेवाभावी वृत्ती जोपासणेही अत्यंत महत्त्वाचे असते. ते जोपासण्याचे काम डॉक्‍टरांची जुनी पिढी जशी करत आहे, तशीच काही प्रमाणात नवी पिढीही त्या पावलावर पाऊल टाकत आहे. एम. डी. मेडिसीन शिक्षण घेतलेले डॉ. साठे यांनी सातारा शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याबरोबर मेढा, नागठाणे, रहिमतपूर येथेही जाऊन तब्बल ४० वर्षे रुग्णसेवा केली. ग्रामीण भागातील जनतेचे दु:ख, आर्थिक परिस्थिती, राहणीमान जवळून पाहिल्याने सामाजिक बांधिलकीतून अत्यंत माफक दरात औषधोपचार केले. 

साताऱ्यात चिंतामणी हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर ते दिवसा, रात्रीही रुग्ण तपासणीसाठी जात होते. आपल्याकडे दाखल होईल, त्या रुग्णाला उपचार देणे, हीच महत्त्वाकांक्षा,  तर ‘आय ट्रीट, गॉड हिल्स’ (मी उपचार करतो, देव बरे करतो) हे ध्येय ठेवून ते आजही कार्यरत आहेत. विश्‍वास पैशाने नाही, तर वागणुकीने येतो. नवविवाहित जोडपे दवाखान्यात आले, पतीच्या मेंदूच्या अवरणात रक्‍तस्त्राव झालेला, प्राथमिक तपासणी, उपचार केले आणि पुढील तपासणीसाठी प्रामाणिक सल्ला दिला आणि तो रुग्ण वाचलाही. अशी अनेक उदाहरणे ते सांगतात. ते आठ वर्षे युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे संचालक, अर्कशाळेचे संचालक होते. आता आनंद आश्रमचे संचालक आहेत. वय जास्त झाले तरीही ते शक्‍य तितकी रुग्णसेवा करत आहेत. 

आजोबा, वडिलांकडून बाळकडू
प्रसिध्द वकील आजोबा तात्यासाहेब साठे, वडील ॲड. आप्पासाहेब साठे यांच्याकडून डॉ. अनंत साठे यांना प्रामाणिकतेचे बाळकडू मिळाले. तेच बाळकडू त्यांचे पुत्र डॉ. अजय यांना मिळाले. वडिलांची रुग्णांप्रतीची आपुलकी, सेवाभावी वृत्ती पाहून तेही वैद्यकीय पेशात आले. डॉ. अजय, सून डॉ. भक्‍ती या दोघांनाही प्रामाणिकतेने रुग्णांची तपासणी करा, पैशासाठी अडवू नका, असे डॉ. अनंत साठे यांचे आजही सांगणे असते.

Web Title: satarar news Dr. anant sathe